लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा बालगंधर्व पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ज्येष्ठ आॅर्गनवादक चंद्रशेखर देशपांडे यांचे नाव एका नेत्याच्या सांगण्यावरून ऐनवेळी काढल्याचा आरोप त्यांच्या शिष्यांनी केला आहे. बालगंधर्वांना साथसंगत करणाऱ्या, संगीतासाठी आयुष्य वेचणाऱ्याला मुख्य पुरस्कार देणे अपेक्षित असताना शिष्यांच्या बरोबरीने विशेष पुरस्काराच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला गेला. त्यामुळे शिष्यांच्या आग्रहावरून देशपांडे यांनी पुरस्कार नाकारला. महापालिकेच्या वतीने दर वर्षी बालगंधर्वांच्या जयंतीचे औचित्य साधून बालगंधर्व पुरस्कारांच्या नावाची घोषणा केली जाते. यंदा या पुरस्कारासाठी नाट्य व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तीची निवड केल्याने संगीत नाट्यक्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. ज्येष्ठ आॅर्गनवादक हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून संगीताचा वारसा मिळालेल्या चंद्रशेखर देशपांडे यांनी संगीतासाठी आयुष्य समर्पित केले. बालगंधर्वांना आॅर्गनवादनाची साथसंगत केली. ३०० ते ४०० संगीत नाटकांमध्ये आॅर्गन वादन केले, आयुष्यभर बालगंधर्वांच्या गाण्यांचा प्रचार प्रसार केला़ त्यांना मुख्य पुरस्कारासाठी डावलण्यात आले आणि आपल्याच शिष्याला देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये त्यांचा समावेश करण्याचा प्रताप निवड समितीने केला. विशेष म्हणजे, मुख्य पुरस्कारासाठी त्यांच्याच नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेले होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्या नावावर फुली मारत दुसऱ्याचे नाव घोषित करण्यात आले असल्याचाही आरोप देशपांडे यांच्या शिष्यांनी केला आहे. देशपांडे यांच्या नावासाठी समितीमधील तीन जणांचे अनुमोदन होते.जवळपास त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, ऐनवेळी एका नेत्याने हस्तक्षेप केल्यामुळे त्यांचा अधिकार डावलण्यात आल्याचे समजते. या कारणासाठी महापालिकेकडून देण्यात येणारा पुरस्कारच देशपांडे यांनी नाकारला. बालगंधर्व पुरस्कारावरचा त्यांचा अधिकार डावलण्यात आल्याने नाट्य वर्तुळातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जो माझ्या योग्यतेचा पुरस्कार नाही, अशा पुरस्कारांच्या नावात माझा समावेश करण्यात आला. म्हणून मी तो पुरस्कार नाकारला. मुख्य पुरस्कारासाठी माझेच नाव निश्चित झाले होते. मात्र, कुणा पुढाऱ्याने ऐनवेळी नाव बदलले असल्याचे कळते. मी नसलो, तरी माझ्या वडिलांनी आयुष्यभर संगीताची सेवा केली, त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिला असता तरी चालले असते.- चंद्रशेखर देशपांडे, ज्येष्ठ आॅर्गनवादकचंद्रशेखर देशपांडे यांनी बालगंधर्वांबरोबर काम केले आहे. मात्र, तरीही जो शिष्य त्यांनी घडविला आहे त्याच्याबरोबरच त्यांनाही पुरस्कार देणे, हे त्यांच्यावर निश्चितच अन्याय करण्यासारखे आहे. पुरस्कारासाठी नक्की कोणते निकष ठरवले गेले हे कळायला हवं. जी माणसे हाती काही मिळणार नाही हे माहीत असूनही प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे धाडस करतात त्यांची अशी उपेक्षा करणे चुकीचे आहे.- कीर्ती शिलेदार, ज्येष्ठ नाट्य संगीत गायिकाचंद्रशेखर देशपांडे यांनी बालगंधर्वांबरोबर काम केले आहे. मात्र, तरीही जो शिष्य त्यांनी घडविला आहे त्याच्याबरोबरच त्यांनाही पुरस्कार देणे, हे त्यांच्यावर निश्चितच अन्याय करण्यासारखे आहे. पुरस्कारासाठी नक्की कोणते निकष ठरवले गेले हे कळायला हवं. जी माणसे हाती काही मिळणार नाही हे माहीत असूनही प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे धाडस करतात त्यांची अशी उपेक्षा करणे चुकीचे आहे.- कीर्ती शिलेदार, ज्येष्ठ नाट्य संगीत गायिका
‘बालगंधर्व’ पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: July 05, 2017 3:44 AM