पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील सर्वाधिक सांस्कृतिक कार्यक्रम होणारे बालगंधर्व रंगमंदिर आणि सर्वाधिक आसनक्षमता आणि प्रदर्शनासाठी मोठी जागा असल्याने वर्षभर रेलचेल असणारे गणेश कला क्रीडा मंच महापालिकेच्याच फायर आॅडिटमध्ये नापास झाले आहे. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रम अथवा प्रदर्शनावेळी मुंबईप्रमाणेच येथेही आगीची दुर्घटना घडल्यास मोठी जीवित तसेच वित्तहानी होण्याची भीती आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी कोेट्यवधींची आग प्रतिबंधात्मक यंत्रणा उभारण्यात आली असली तरी, दरवर्षी त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने ही यंत्रणा नादुरुस्त आहे. गणेश कला क्रीडा मंच हे महापालिकेचे सर्वाधिक आसनक्षमता असलेले नाट्यगृह आहे. तर या नाट्यगृहाच्या खालील बाजूस प्रदर्शनांसाठी सोय आहे. त्यामुळे वर्षभर या नाट्यगृहास मागणी असते. त्यात प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण, मेळावे अशा कार्यक्रमांचा समावेश असतो. महापालिकेचेही सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या संख्येने होतात. बचत गटांचे प्रदर्शन, शिक्षण मंडळाच्या शाळांचे स्नेहसंमेलन तसेच इतर कार्यक्रम घेतले जातात. गणेश कलाची आसनक्षमता जास्त असल्याने या ठिकाणी प्रेक्षकांची वर्दळ मोठी असते. प्रदर्शन भरले असल्यास ते पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येनेही हजेरी लावतात. मात्र, अशा कार्यक्रमावेळी एखादी आगीची घटना घडल्यास ती रोखण्यासाठी असलेली यंत्रणा गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे.अशीच स्थिती बालगंधर्व रंगमंदिराचीही आहे. हे नाट्यगृह प्रामुख्याने नाटक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वर्षभर बुक असते. या ठिकाणीही अग्निशमन यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. मात्र, त्याच्या नियमित देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नसल्याने या ठिकाणची यंत्रणाही बंद असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)महापालिकेने बांधलेल्या या नाट्यगृहांच्या फायर आॅडिटची जबाबदारी अग्निशमन दलाकडे आहे. त्यानुसार, शहरातील सर्व नाट्यगृहांचे आॅडिट या विभागाकडून केले जाते. बालगंधर्व आणि गणेश कला मंच वगळता तसेच इतर नाट्यगृहेही नवीन असल्याने त्यांची यंत्रणा कार्यरत असल्याचे सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या आॅडिटमध्ये दिसून आले आहे. त्यानंतर आग लागल्यास मोठी अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने अग्निशमन विभागाकडून गेल्या सहा महिन्यांपासून या नाट्यगृहांची जबाबदारी असलेल्या सांस्कृतिक केंद्र विभागास गेल्या सहा महिन्यांपासून स्मरणपत्रे पाठविली जात आहेत. त्यानंतरही त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.बालगंधर्व नाट्यगृह आणि गणेश कला क्रीडा मंचमधील आगप्रतिबिंधक यंत्रणा जुनी झालेली आहे. इतर नाट्यगृहांमध्ये नवीन यंत्रणा असल्याने याच धर्तीवर बालगंधर्व आणि गणेश कला क्रीडामध्ये अशीच यंत्रणा लवकरच बसविली जाईल.- राजेंद्र जगताप, अतिरिक्त आयुक्त
बालगंधर्व, गणेश कला फायर आॅडिटमध्ये नापास
By admin | Published: February 17, 2016 1:39 AM