लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बालगंधर्वांच्या गायकीत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडते. माझे पणजोबा बालगंधर्वांचे समकालीन होते. त्यामुळे लहानपणापासूनच मी घरात बालगंधर्वांची गायकी, शैली आदी चर्चा ऐकत आलो आहे. बालगंधर्व हे माझ्यासाठी दैवतापेक्षा कमी नाहीत,’ अशा शब्दांत गायक आनंद भाटे यांनी भावना व्यक्त केल्या. बालगंधर्वांच्या १३०व्या जयंतीनिमित्त आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त व्यंकटेश श्रीपाद राजहंस लिखित ‘असा हा राजहंस’ या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी भाटे बोलत होते. अनुबंध प्रकाशन आणि संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. माधवी वैद्य यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या वेळी ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे, सुमती दसनूरकर, व्यंकटेश राजहंस यांची कन्या नीलांबरी बोरकर, कीर्ती शिलेदार, मेघराज राजेभोसले, निकिता मोघे, लता शिलेदार, सुनील महाजन, अनिल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी भाटे यांनी ‘एकच प्याला’ या नाटकातील ‘प्रभो जी गमला मनी तोषिला’ ही भैरवी सादर केली. ‘बालगंधर्वांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संगीत नाट्यरंगभूमीच्या संवर्धनासाठी आणि प्रचार-प्रसारासाठी वाहून घेतले. बालगंधर्वांची संगीत नाटके पाहण्यासाठी अथवा सादर करण्यासाठी, संगीत रंगभूमीचा प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी बालगंधर्वांच्या जयंतीचा मुहूर्त साधत दर महिन्याची २६ तारीख संगीत नाटकांसाठी आरक्षित ठेवावी, अशी सूचना चारुदत्त आफळे यांनी केली.कीर्ती शिलेदार यांनी बालगंधर्व आणि रंगमंदिराविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. सुमती दसनूरकर, व्यंकटेश राजहंस यांची कन्या नीलांबरी बोरकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा ‘मम आत्मा गमला’ हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम रंगला. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. अनिल कुलकर्णी यांनी पुस्तक प्रकाशनामागील भूमिका विशद केली.
बालगंधर्व माझ्यासाठी दैवतच
By admin | Published: June 27, 2017 7:58 AM