पुणे : यंदाच्या मान्सूनवर एल निनो या घटकाचा प्रभाव असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. मात्र भारतीय हवामान शास्त्र विभागाने आज दिलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार या घटकासह हिंद महासागर द्विधृव हा घटक देखील प्रभावी असल्याने मॉन्सून यंदा सरासरी इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे दरम्यान जूनमध्ये मध्य भारतात विशेष करून महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने आज मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मॉन्सून यंदा चार जूनपर्यंत केरळमध्ये धडक देणार आहे. सध्या मान्सून हा अंदमान सागरात तसेच बंगालच्या उपसागराकडे प्रगती करत आहे. हा प्रवाह सध्या हळूहळू सक्षम होत आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख ४ जून अशी अपेक्षित ठेवण्यात आली आहे. यात किमान चार दिवसांचा कालावधी मागे पुढे होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाचे डॉ. डी. एस. पै यांनी व्यक्त केली. मात्र मानसून एक जूनला यंदा केरळमध्ये दाखल होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत पै अधिक म्हणाले यंदाची एल निनोची स्थिती स्पष्ट होत आहे. एल निनो म्हणजे कमी पाऊस असे जरी असले तरी एल निनोच्या वर्षात पाऊस कमी होतोच असे नाही. १९९७ मध्ये एल निनो प्रभाव जास्त असूनही पाऊस चांगला झाला होता. यंदा एल निनोचा प्रभाव हा मॉन्सूनच्या जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये कमी असेल. मात्र त्यानंतर ते पुढील हिवाळ्यापर्यंत त्याचा प्रभाव वाढून तो अधिक सक्षम होणार आहे. जोडीला इंडियन ओशन डायपोल अर्थात हिंद महासागर द्विध्रुव हा घटक देखील असण्याची शक्यता आहे. या घटकामुळे मान्सूनवर चांगला परिणाम होतो. त्यामुळेच एल निनोची स्थिती जरी निर्माण झाली असली तरी आयओडी या घटकामुळे मानसून सरासरी इतका पडण्याची शक्यता आहे.
पावसाच्या वितरणानुसार हवामान विभागाने देशाचे चार भाग केलेले आहेत त्यानुसार यंदा उत्तर पश्चिम भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उर्वरित दक्षिण किनारपट्टी, मध्य भारत व उत्तर पश्चिम भारतात पाऊस सरासरी इतका अर्थात ९६ ते १०४ टक्के पडण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्राच्या काही भागात विशेष करून विदर्भ व मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल, अशी शक्यताही या अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे.
जून महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करताना मध्य भारतात पाऊस सरासरी इतका जरी पडणार, असे सांगण्यात आले असले तरी विदर्भ व मराठवाड्यात पाऊस उशिराने व कमी पडणार आहे, असे डॉ. पै यांनी स्पष्ट केले. मात्र कोकणात हाच पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असेही ते म्हणाले. पहिल्या व दुसऱ्या पावसानंतर जमिनीतील ओलाव्याची स्थिती लक्षात घेऊन तसेच पुढील आठवड्याचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
केरळमध्ये चार जूनला दाखल होणारा मान्सून महाराष्ट्रात नेमका केव्हा येईल हे आत्ताच सांगणे शक्य नसले तरी लवकर मान्सून आला म्हणजे चांगला पाऊस पडतो असे समीकरण नसल्याचेही यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मान्सून नेमका किती वेगाने येतो आणि तो कशा पद्धतीने वितरित होतो यावर पावसाचे प्रमाण अवलंबून असल्याचे पै यांनी स्पष्ट केले.