पुणे : ग्रामीण भागातील मुलांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, बालसाहित्याचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत पोचावा, या उद्देशाने २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन अहमदनगरमधील शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे आयोजित संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि चित्रकार ल. म. कडू यांची निवड करण्यात आली आहे. रमेश भारदे स्वागताध्यक्षपद भूषवणार आहेत.गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारदे साक्षरता प्रसारक मंडळातर्फे शेवगाव येथे बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाची कार्यक्रमपत्रिका लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष माधव राजगुरु, कार्यवाह मुकूंद तेलीचेरी, सहकार्यवाह सुनील महाजन, आयोजक संस्थेचे प्रतिनिधी हरीश भारदे, उमेश घेवरीकर, भाऊसाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी मारुंजी येथे २६वे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था बरखास्त होऊन अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेची स्थापना झाली. या संस्थेतर्फे २७ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनापासून विविध स्पर्धा, कार्यक्रमांमध्ये मुलांचाच सहभाग असणार आहे. राज्यभरातील शाळांंशी संपर्क साधून कथाकथन, कविता स्पर्धांसाठी लेखन मागवण्यात येणार असून, विजेत्यांना संमेलनात गौरवले जाणार आहे. संमेलनासाठी राज्याचे सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उपस्थित राहण्याबाबत विनंतीचे पत्र पाठवण्यात आले आहे. संमेलनासाठी तुर्तास शासनाकडे कोणत्याही अनुदानाची मागणी करणार नसल्याचे महाजन यांनी सांगितले.
शेवगाव येथे जानेवारीत रंगणार बालकुमार साहित्य संमेलन; चित्रकार ल. म. कडू अध्यक्षपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:27 IST
ग्रामीण भागातील मुलांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, बालसाहित्याचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत पोचावा, या उद्देशाने २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन अहमदनगरमधील शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
शेवगाव येथे जानेवारीत रंगणार बालकुमार साहित्य संमेलन; चित्रकार ल. म. कडू अध्यक्षपदी
ठळक मुद्दे भारदे साक्षरता प्रसारक मंडळातर्फे शेवगाव येथे बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजनतीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनापासून विविध स्पर्धांत मुलांचाच सहभाग