पुणे : अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने २८ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुस्तकांचे गाव भिलार (महाबळेश्वर) येथे दि. १८, १९ व २० जानेवारी रोजी होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालसाहित्यिक अनिल अवचट यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाला मराठी राज्य विकास संस्था आणि भिलार ग्रामपंचायतचे सहकार्य लाभले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार असून, स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांची निवड करण्यात आली आहे. मसाप पुणेचे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस हे संमेलनाचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. महाबळेश्वर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिलारे हे संमेलन ग्रंथदिंडीचे निमंत्रक आहेत. या संमेलनात व्यासपीठावर मुलांचा अधिक सहभाग असणार आहे. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी संमेलनात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत असल्याचेही डॉ. बर्वे यांनी सांगितले.संमेलनपूर्वी भिलार, सातारा, वाई, महाबळेश्वर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या कथाकथन व काव्य वाचन स्पर्धा घेतल्या जात आहेत. या स्पर्धा २६ ते २८ डिसेंबर दरम्यान विविध शाळांमध्ये पार पडणार आहेत. या पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष माधव राजगुरू, कार्यवाह मुकुंद तेलीचरी, सहकार्यवाह सुनील महाजन, कोशाध्यक्ष दिलीप गरूड, संमेलनाचे समन्वयक शिरीष चिटणीस, सदस्या माधुरी सहस्त्रबुद्धे उपस्थित होत्या.सामाजिक प्रश्नावर केले लेखनडॉ. अनिल अवचट हे व्यवसायाने डॉक्टर असले तरी प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. १९६९ मध्ये त्यांचे ‘पूर्णिया’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. तेव्हापासून अनेक सामाजिक प्रश्नांसह विविध विषयांवर त्यांनी लेखन केले असून, आतापर्यंत त्यांची २२ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लिखाणाप्रमाणेच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामार्फत त्यांनी केलेले सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. ते उत्तम कलाकार आहेत. त्यांची चित्रे, लाकडी शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी यांमधून त्यांचे कलाकौशल्य दिसते.
पुस्तकांच्या गावात बालकुमार संमेलन, संमेलनाध्यक्षपदी अनिल अवचट यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:29 AM