देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदीपात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे तिन्ही बंधारे कोरडे ठणठणीत पडल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.खोरवडी, देऊळगावराजे आणि पेडगाव या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून त्यांवरील पाण्यावरच परिसरातील शेती अवलंबून आहे. मात्र, दोन वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने गेल्या वर्षीपासूनच नदीपात्र कोरडे पडत आहे. या वर्षी आॅक्टोबरअखेरच बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतातील उभी पिके जळून जाऊ शकतात. तर, जनावरांच्या पिण्याचे पाणी तसेच चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दौंडचा पूर्व भाग हा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. येथे प्रामुख्याने ऊस हे नगदी पीक घेतले जाते. दौंड तालुक्यातील दौंड शुगर, भीमा-पाटस, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज साखर कारखाने यांसह कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगरला मोठ्या प्रमाणात ऊसपुरवठा होत असतो. मात्र, चालू वर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने नवीन ऊसलागवड करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोट्याचे असल्याने जवळजवळ गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू हंगामात नवीन ऊसलागवडीत अंदाजे ४० टक्के घट झाली असल्याचे येथील शेतकरी जगन्नाथ बुऱ्हाडे यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी नवीन ऊसलागवड विहीर, विंधन विहिरीवर अवलंबून केली आहे अशा विहिरी, विंधन विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने त्यांच्यापुढे ऊसपीक जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दौंडच्या पूर्व भागातील शेतमजुरांवर दुष्काळाचे सावट आले आहे. कारण, येथील बागायती पट्ट्यातील शेतातच शेतमजुरी करून आपल्या दैनंदिन गरजा भागवत असल्याने पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसलागवड न झाल्याने त्यांना काम मिळणे कठीण होणार आहे. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. (वार्ताहर)
भीमा नदीपात्रातील बंधारे कोरडे ठणठणीत
By admin | Published: November 12, 2015 2:33 AM