पाईट - भामा आसखेड धरणामधून अत्यंत गोपनीय पद्धतीने गुरुवारी सायंकाळी सोडण्यात आलेले आवर्तन शुक्रवारी धरणग्रस्तांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे बंद करण्यात आले. या वेळी आक्रमक धरणग्रस्तांनी ‘लाभक्षेत्रामधून आम्हाला वगळा, अशी मागणी करता; मग आवर्तन कशाला पाहिजे,’ असा सवाल करीत आमचे पुनर्वसन झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.भामा आसखेड धरणावरून काल सायंकाळी ६ वाजता ७५० क्युसेक्स वेगाने सांडव्यावाटे आवर्तन सोडण्यात आले होते. याबाबत कार्यकारी अभियंता लोंढे यांच्या तोंडी आदेशाने आवर्तन सोडण्यात आले असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. रात्रीमधून अत्यंत गोपनीयरीत्या कोणालाही कोणतीही पूर्वकल्पना न देता आवर्तन सोडल्याने धरणग्रस्त आक्रमक होऊन भामा आसखेडच्या परिसरात जमा झाले होते.याबाबत करंजविहिरे येथे भामा आसखेड कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, शाखाधिकारी भारत बेंद्रे यांच्यासमवेत धरणग्रस्तांची बैैठक झाली. यामध्ये सांडव्यावाटे सोडण्यात येणारे आवर्तन त्वरित बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात आली. या वेळी सत्यवान नवले, बळवंत डांगले, किसन नवले, गणेश नवले, धोंडिभाऊ कुडेकर, रोहिदास जाधव, गणेश जाधव, मंदार डांगले, सचिन कुडेकर, सचिन डांगले आदी धरणग्रस्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.भामा आसखेडचे उन्हाळी आवर्तन १ एप्रिल रोजी सोडण्यात येत असते. परंतु भामा आसखेड धरणग्रस्तांनी २२ मार्चपासून आंदोलन सुरू केले असून आवर्तन सोडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनाआवर्तन सोडू दिले नाही.तर किंमत मोजावी लागेल... या वेळी धरणग्रस्तांनी कोणत्याही छुप्या पद्धतीने पाणी सोडल्यास वा कोणतेही काम छुप्यारीत्या करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची किंमत प्रशासनाला मोजावी लागेल, असा इशारा या वेळी दिला.लोकप्रतिनिधींची दुटप्पी भूमिकाभामा आसखेड धरणातून नदीपात्रामधून आवर्तन सोडल्यास हवेली, दौंड, शिरूर तालुक्यातील ८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यात येत असतात. यामुळे या तिन्ही तालुक्यांतील शेतीला पाणीपुरवठा होत असतो. या तिन्ही तालुक्यातील आमदारांनी भामा आसखेडचे लाभक्षेत्र वगळण्याची मागणी केली आहे. लाभक्षेत्राचे शिक्के काढण्याची एकीकडे मागणी करीत असून दुसरीकडे शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत. हा विरोधाभास लक्षात घेऊन पाणी सोडण्यासाठी धरणग्रस्तांचा तीव्र विरोध आहे.पोलीस बंदोबस्त... भामा आसखेडवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हवालदार विलास गोसावी, चंद्रकांत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भामा-आसखडेचे आवर्तन पाडले बंद, धरणग्रस्त आंदोलक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 2:52 AM