पुणे : महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, यातून केवळ इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा असल्यामुळे त्यांना यामधून वगळण्यात आले आहे़ तर सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमास तसेच भूमीपूजन, उद्घाटन समारंभ व तत्सम कार्यक्रमांनाही १ एप्रिल पासून पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या आढावा बैठकीनंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी (दि.26) नवीन कोरोनाबाबतच्या निर्बंधांचे आदेश काढले आहे. नवीन आदेश येईपर्यंत या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असणार आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशात सर्व कोचिंग क्लासेस (एमपीएससी,युपीएससी वगळून) ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याबाबत व एमपीएससी,युपीएससीचे क्लासेस आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनुसार सुरू ठेवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्कार व दशक्रियाविधीकरिता २० लोकांना परवानगी देण्यात आली आहे.
जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा वगळता १ एप्रिलपासून रात्री अकरा ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णत: जमावबंदी करण्यात आली आहे. यातून जीवनावश्यक वस्तू वृत्तपत्र सेवा वगळण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात सर्व प्रकारच्या राजकीय,सांस्कृतिक,सामाजिक धार्मिक, कार्यक्रमांना बंदी असणार आहे. तसेच लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना च उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. नवीन आदेशात अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आली आहे.
आयुक्तांच्या आदेशामध्ये सर्व प्रकारचे खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, शासकीय , निमशासकीय कार्यालयांबाबत तेथील प्रमुखांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यायचा आहे. मात्र, याचवेळी कोविड बाबतच्या सर्व आदेशांचे पालन होणे आवश्यक असणार आहे.
उत्पादन क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येतील. पण त्या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल अशा प्रकारे उपस्थितीबाबत नियोजन करावे लागणार आहे.
* नागरिक व कर्मचाऱ्यांना विनामास्क प्रवेश देता कामा नये.
* प्रवेशद्वारावर थर्मामिटरद्वारे तपासणी करण्यात यावी.
* सॅनिटायझर चा वापर उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.
* कोरोना नियमावलीचे पालन होते की नाही यासाठी कर्मचारी नियुक्त करावे.
* सदर नियमांचा भंग झाल्यास केंद्र शासन कोविड आपत्ती संपूर्णपणे संपली असे जाहीर करत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्यात येतील. तसेच आस्थापना मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
* संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, मार्गदर्शक सूचना, पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील.
..........
महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे:
1. प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील मॉल, थिएटर, रेस्टॉरंट, बार, फूट कोर्ट यांना रात्री 10 पर्यंतच मुभा
2. घरपोच जेवणाची सुविधा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार
3. प्रतिबंधात्मक सूचनांची माहिती दर्शनीय भागात लावणे बंधनकारक
4 धार्मिक स्थळांमधील प्रवेशावर मर्यादा, आॅनलाइन पासची सुविधा
5. लग्नसमारंभासाठी केवळ 50 जणांना उपस्थित राहता येईल.
6. अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना परवानगी
====
* शहरातील सर्व आस्थापनांमध्ये विनामास्क प्रवेश नाही.
* प्रवेशद्वारावर थर्मामिटर, थर्मल गन, पल्स आॅक्सिमीटर ठेवण्यात यावा.
* हॅन्ड सॅनिटायझर ठेवणे.
* सुरक्षित अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे.