लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्व सरकारी व खाजगी कार्यक्रमांना बंदी घातली असताना गुरुवारी (दि. ८) सेंट्रल बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावरील पणन संचालनालयाच्या नूतनीकृत कार्यालयाच्या थेट सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला. यासाठी कार्यालयास सदिच्छा भेट अशा स्वरूपाची जाहीर पत्रिका काढून थाटामाटात कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. पणन, सहकार आणि पुणे बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेवर कडक निर्बंध घातले असताना सरकारी अधिकारी, मंत्र्यांना कोणतेही बंधने पाळणे बंधनकारक नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्यात पुणे, मुंबईसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये व आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. सध्या एकट्या पुणे जिल्ह्यात दिवसाला १०-१२ हजार रुग्ण नव्याने सापडत आहेत. यामुळेच उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत सर्व शासकीय व खाजगी सार्वजनिक कार्यक्रम शंभर टक्के बंद करण्याचे आदेश दिले. एवढेच नाही तर अशा कार्यक्रमांना लोकप्रतिनिधी उपस्थित राहिल्यास त्याच्यावर देखील गुन्हे दाखल करा असे आदेश दिले. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यातच कडक निर्बंध लागू केले.
भेटीच्या नावाखाली जल्लोषात उद्घाटन
अशा परिस्थितीत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची नूतनीकृत कार्यालयास सदिच्छा भेटीच्या नावाखाली जल्लोषात उद्घाटन केले. महाराष्ट्र राज्यातील कृषी पणन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी पणन संचालनालयाना केलेल्या विविध उपाययोजनांबाबत सदर भेटीवेळी सविस्तर सादरीकरण केले. पणन संचालक सतीश सोनी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची संपूर्ण सेंट्रल बिल्डिंगमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.