कोरेगाव भीमा : वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणे नगर महामार्गावरील रस्त्यावर भर म्हणुन की काय दररोज सायंकाळच्या सुमारास अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. या वाहतुक कोंडीतुन प्रवाशांची सुटका करण्यासाठी पुणे-नगर महामार्गावर ठराविक वेळेत सकाळ-संध्याकाळ अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहे. शिक्रापूर ता. शिरूर येथील चाकण चौक तसेच पुणे नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर चाकण रस्त्यावरील करंदी फाटा येथे नेहमीच वाहतूककोंडी होत असल्यामुळे परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी तसेच कामगार त्रस्त झाले आहेत. त्यातच भर म्हणुन रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी व कामगार वर्गाला कामावर ने-आण करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर बसेस व चारचाकी वाहने या रस्त्यावरुन धावत असतात. तसेच शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि या रस्त्यावरून प्रवास करत रुग्णांना रुग्णालयात नेणा-या रुग्णवाहिकांना देखील वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता, अनेकदा पुणे- नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी हा चचेर्चा विषय बनत होता आणि वाहतूककोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण तर झाला आहेच शिवाय या महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांनाही वेळेच्या विलंबाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. यापूर्वी शिक्रापूर, जातेगाव, करंदी, कासारी येथील ग्रामपंचायतींनी लेखी पत्राद्वारे पुणे नगर तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केलेली होती. त्यापत्रानुसार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मोटार वाहन कायद्यानुसार, पुणे- नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा ते कोंढापुरी तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर शिक्रापूर ते वाजेवाडी चौफुला या दरम्यान अवजड वाहनांना प्रायोगिक तत्वावर तीस दिवस बंदी घातली असून त्या आदेशावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत, त्यामुळे आता पुणे नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा ते कोंढापुरी तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर शिक्रापूर ते वाजेवाडी चौफुला या दरम्यान अवजड वाहनांना सकाळी सहा ते साडेआठ तसेच सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेमध्ये प्रवास करण्यास बंदी राहणार असून बंदीच्या कामामध्ये सदर वाहने ही नगर बाजूकडून येणारी वाहने कोंढापुरी येथील खंडाळा माथा तर पुणे बाजूकडून येणारी वाहने तुळापुर फाटा परिसरात वाहनचालकांच्या सोयीनुसार पार्किंग करण्यात येतील असे जिल्हाधिका-यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे................सहा वर्षात पुणे-नगर महामार्गावर अपघातात ३२३ व्यक्ती मयत पुणे नगर महामार्गावर सन २०१३ ते २०१८ या सहा वर्षात शिक्रापूर (ता. शिरूर ) व लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ११४७ अपघातामध्ये ३२३ व्यक्ती मयत आणि ५७० व्यक्ती जखमी झाले आहेत. त्यामुळे पुणे-नगर महामार्गावर सकाळी सहा ते साडे आठ व संध्याकाळी पाच ते रात्री दहा याकाळात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असुन नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर कारवाई सुरु केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास शेळके यांनी दिली,
पुणे- नगर महामार्गावर अवजड वाहनांना बंदी : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 7:17 PM
शिक्रापूर, जातेगाव, करंदी, कासारी येथील ग्रामपंचायतींनी लेखी पत्राद्वारे पुणे नगर तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केलेली होती,
ठळक मुद्देरस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना , सहा वर्षात अपघातात ३२३ मृत्यु सकाळी सहा ते साडेआठ तसेच सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेमध्ये बंदी राहणार