खडकी बाजार: पुणे शहरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. आता आठ नंतर जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काही दुकाने हातगाड्या, हॉटेल्स सर्रासपणे सुरू आहे. त्यावर बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तर या गोष्टींकडे खडकी पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
कोरोनाचा हाहाकार सर्वत्र सुरू आहे. शासनातर्फे कोरोना नियंत्रणात यावा याकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहे. रात्रीची संचारबंदी असतानाही रात्री अकरा साडेअकरा वाजेपर्यंत खडकी बाजार येथील हॉटेल क्राऊन सुरू असते. तर खडकीतील अनेक चौकात पान टपऱ्या रात्री बारा वाजेपर्यंत लपूनछपून सुरू असतात. त्याचप्रमाणे उशिरापर्यंत दरवाजा बंद करून चायनीजची काही हॉटेल सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन शिवाजीनगर एसटी बस स्थानक समोर शासकीय दूध डेअरी जवळ तर ओळीने रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असतात. तसेच खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा याठिकाणी या बसेस मुले अपघात घडले आहेत तरीसुद्धा या बसेस रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत. शिवाजीनगर एसटी बसस्थानक शेजारीच अनेक पान टपऱ्या तसेच एक हॉटेल रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते या कडे खडकी पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील सोसायट्यांमधील काही नागरिक करीत आहेत. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या दुकानांना हॉटेल व खाजगी बसेस यांना त्वरित बंदी घालावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.