लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी आळंदी ते मरकळ भागातून प्रवाहित होणाऱ्या इंद्रायणी नदीत गणेश विसर्जनास संपूर्ण अकरा दिवस बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आळंदी पालिका आणि पोलिसांनी सोमवारी (दि. ६) विशेष बैठक आयोजित करून आवश्यक चर्चा करून नियमावली जाहीर केली आहे. दरम्यान तीर्थक्षेत्र आळंदी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपापल्या घरीच विधिवत मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने केले आहे.
याप्रसंगी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, तुषार घुंडरे, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले-पाटील, उत्तम गोगावले, गोपनीय विभागाचे मच्छिंद्र शेंडे आदी पदाधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सध्या कोविड संसर्ग काही प्रमाणात कमी कमी होत आहे. मात्र, आळंदी शहरात तसेच दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी, मोशी, डुडूळगाव आणि आळंदी लगतच्या गावांमध्येही कोरोनाचे रुग्ण काहीअंशी आढळून येत आहेत. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात या भागातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त गणेश विसर्जनासाठी आळंदीतील इंद्रायणीकाठी गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर इंद्रायणीवर गर्दी होऊ नये तसेच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आळंदी पालिका आणि पोलिसांनी पवित्र घाट गणेश विसर्जनासाठी अकराही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती विघटन होण्यासाठी पाण्यामधे सोडीअम बायकार्बोनेटचा वापर करावा असे, आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.
कोट
गणेशोत्सव काळात प्राणप्रतिष्ठा व विसर्जन मिरवणूकीला बंदी आहे. तसेच पवित्र इंद्रायणीचे दोन्हीही घाट बंद ठेवले जातील. नदीपात्रात गणेश विसर्जनाचा कोणी प्रयत्न केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी.
फोटो ओळ : आळंदीत आयोजित पत्रकार परिषदेत गणेशोत्सव उपाययोजनांची माहिती देताना पदाधिकारी. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)