लोणावळा: लोणावळा शहरातील भुशी धरण (Bhushi dam), टायगर पॉईंट (Tiger Point) सह भाजे धबधबा व इतर सर्व पर्यटन स्थळांवर रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा (Lonavala Rain) जोर काहीसा कमी झाला असल्यामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे व भुशी धरण तसेच भाजे धबधबा येथील पायऱ्यांवरून वाहणारे पाणी यांचा वेग देखील कमी झाला आहे. या पायऱ्यांवर बसून वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा दिवस सादर मोठ्या प्रमाणात पर्यटक या पर्यटन स्थळांवर दाखल झाले होते.
मागील आठवड्यामध्ये लोणावळा शहर व ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने या सर्व परिसरामधील जनजीवन विस्कळीत झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मागील संपूर्ण आठवडा हा सर्व परिसर पर्यटकांना मुकला होता. आज मात्र रविवारी या सर्व परिणाम स्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
मावळ व मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास २५ जुलै ते २९ जुलै दरम्यान प्रशासनाने बंदी घातली होती. पावसाचा जोर कमी झाल्याने ही बंदी २७ जुलैच्या मध्यरात्रीनंतर उठवली होती. त्यानंतर पुन्हा हवामान विभागाने पुढील चार दिवस पुणे जिल्ह्यात व घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट दिल्याने पुन्हा बंदीचा नवीन आदेश प्रांत अधिकारी यांनी लागू केला आहे. दरम्यान आज पावसाचा जोर कमी असल्याने व पर्यटक देखील मोठ्या संख्येने आल्याने सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी वर्षाविहाराचा मनमुराद आनंद घेतला. भुशी धरणाप्रमाणे सहारा पुल धबधबा, टायगर पॉईंट, खंडाळा येथील राजमाची पॉईंट या सर्व परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. धरणावर लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सहारा पुल येथे देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे. भाजे धबधबा परिसरामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस बंदोबस्त नियुक्त केला होता तसेच पवना धरणाच्या जलाशय परिसरात देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.