श्रीकिशन काळे
पुणे: गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळांसह घराेघरी या उत्सवाची तयारी सुरू आहे. अशातच सार्वजनिक मंडपात पीओपीची मूर्ती बसवू देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकांना दिले आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांसह भाविकांना प्रश्न पडला की, नेमकी मूर्ती बसवायची काेणती? त्याशिवाय जवळपास सर्वच मंडळांनी आधीच मूर्ती बूक केल्या आहेत. त्यांनी काय करायचे? पुण्यात मोठी मंडळे कायमस्वरूपी मूर्ती बसवत असल्याने हा निर्णय मुंबईसाठी लागू होऊ शकतो, अशीही चर्चा मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. स्पष्ट निर्देश नसल्याने मूर्ती कोणती बसवायची? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात आलेली नाही; पण सार्वजनिक मंडपामध्ये पीओपीची मूर्ती बसवू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने दिले आहेत, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
पीओपीच्या मूर्तींना बंदी नाही; पण सार्वजनिक मंडपात त्या बसवायच्या नाहीत, असे जाहीर करण्यात आल्याने नागरिक संभ्रमात आहेत. २०२० मध्ये पीओपी गणेशमूर्तीवर बंदीबाबतचा आदेश दिला. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी होत नाही. न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारकडूनदेखील दरवर्षी पीओपी गणेशमूर्तीवर बंदीची भूमिका घेतली जाते; पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नाही. ‘पीओपी’बाबत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाने जी नियमावली तयार केली, त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत, तसेच गणेश मंडळांना परवानगी देताना पीओपी बंदीची अट घालणे आवश्यक असल्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकांना दिले आहेत.
पीओपीचे विसर्जन तलावात नको!
घरांमध्ये पीओपीच्या मूर्ती अधिक असतात. घरगुती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तलाव, विहीर आणि नदी, नाल्यात सोडल्या जातात. त्यांचे विघटन न झाल्याने त्या अनेक महिने पाण्यावर तरंगताना दिसतात. एक प्रकारे ही विटंबनाच केली जाते. मासे आणि इतर जलचर, पशू- पक्ष्यांवरदेखील याचा विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मातीपासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती घ्याव्यात. हौदात विसर्जन करावे, अशी भूमिका जीवित नदी संस्थेने स्पष्ट केली आहे.
पीओपीचे काम ९० टक्के बंद झाले आहे. पुण्यातील मंडळांच्या मूर्ती कायमस्वरूपी आहेत. नदीत प्रदूषण होत नाही. पूजेची मूर्ती शाडू मातीची वापरतात. कसबा आणि जोगेश्वरीच्या मूर्ती शाडू मातीच्या आहेत. घरगुती मूर्ती वापरतात. सार्वजनिक मंडळात पीओपी वापरत नाहीत. मुंबईमध्ये अडचण येते. मोठ्या मूर्ती असतात. समुद्रात टाकतात. हौदात टाकतात. आपल्याकडे त्यांचा पुनर्वापर होतो. -नितीन पंडित, तुळशीबाग गणेश मंडळ
गेल्या तीन वर्षांपासून आम्ही वृत्तपत्राच्या लगद्यापासून मूर्ती तयार करतो; पण त्याला नागरिकांकडून मागणी नाही. लोकांना पीओपीची मूर्ती लागते, आवडते. खरंतर लगद्यापासूनची मूर्ती ही पर्यावरणपूरक तर आहेच; पण तिचे रिसायकलदेखील होते. लोकांमध्ये त्याची जागृती झाली नाही, ती व्हायला हवी. पर्यावरणासाठी हा उत्तम पर्याय आहे. -संतोष राऊत, कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनविणारे
सार्वजनिक मंडपात पीओपीची मूर्ती बसवू नये, याचे निर्देश केंद्रीय मंडळाने दिले आहेत. त्याबाबत अद्याप आमच्याकडे काही माहिती आली नाही. स्थानिक पातळीवर आम्ही तपासणी करायची की नाही, त्याच्याही सूचना नाहीत. -जय शंकर साळुंखे, अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण, पुणे
पर्यावरण रक्षणासाठी...
पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी अनेक जण घरामध्ये सुपारीची प्रतिष्ठापना करतात. काही जण कुंडीतील मातीपासून मूर्ती बनवतात आणि विसर्जनही कुंडीमध्येच करतात. ज्यांनी पीओपीची मूर्ती घेतली असेल ते हौदामध्ये विसर्जन करण्यावर भर देतात. त्यामुळे नदीमध्ये विसर्जनाचे प्रमाण कमी झाले आहे.