पिंपरी : गडकिल्ल्यांचे संवर्धन करीत असताना अनेक गडकिल्ल्यांवर होणाऱ्या ३१ डिसेंबरच्या पार्ट्यां होतात. गडांचे पावित्र्य कायम राखणे गरजेचे आहे. या पार्ट्यांवर निर्बंध आणण्याची गरज आहे, अशी मागणी विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांनी अधिवेशनात केली.
विधिमंडळ अधिवेशनात गड-किल्ल्यांच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना गोरखे यांनी गड-किल्ल्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. गोरखे म्हणाले, ‘गड किल्ल्यांच्या बाबतीत आपली चर्चा होत आहे. विधेयक मांडण्यात आले. त्याविषयी तीन सूचना करणार आहे. महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहेत. त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गड किल्ल्यांवर ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यावर निर्बंध आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर विविध कंपन्यांचा सीएसआर निधी असतो. त्या कंपन्यांना गड किल्ले संवर्धनासाठी दत्तक द्यावे.’
अपघात रोखावेतपर्यटन स्थळांच्या ठिकाणी सेल्फी घेताना अनेक अपघात होतात. ते रोखण्यासाठी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षित असे सेल्फी पॉइंट निर्माण करण्याची गरज आहे, असे सांगून गोरखे म्हणाले, ‘राजस्थानमध्ये अनेक राजवाडे पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात. त्या धरतीवर गड किल्ले पाहण्यासाठी आपल्याकडे पर्यटन विकास करण्याची गरज आहे. पर्यटनस्थळे नव्हे तर प्रेरणास्थळे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.’
शासकीय शववाहिन्या कमी
ग्रामीण भागामध्ये शासकीय शववाहिन्यांचे प्रमाण कमी आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातून घरी आणि घरातून स्मशानभूमीमध्ये शव नेण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर खर्च पडतो. राज्यातील तालुक्याच्या ठिकाणी एक शववाहिनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने काही शववाहिन्या आहेत. मात्र, त्यांचा उपयोग योग्य पद्धतीने होत नाही, तो व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे गोरखे म्हणाले.