लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कलाकार हा नेहमी नावीन्याचा ध्यास घेणारा असतो. ज्ञान व कौशल्य यांच्या जोरावर तो आपली ओळख तयार करत असतो. कला जोपासताना तंत्रज्ञानाचे साह्य घेऊन ती आणखी विकसित करणे हीच काळाची खरी गरज आहे. तंत्रज्ञान आणि कला यांची योग्य सांगड घातल्यास तुम्ही नक्कीच या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकता, असा कानमंत्र डॉ. गीता मोहन यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डिझाईन स्किल्स ॲकॅडमीच्या अध्यक्षा श्रीदेवी सतीश, समीर प्रभुने आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत डिझाईन स्किल्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी २ सुवर्ण, १ रौप्य तर २ कांस्य पदके पटकावली. या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन डिझाईन स्किल्स अकॅडमीच्या वतीने केले होते.
राज्य स्पर्धेत ग्राफिक डिझाईन स्किल्स गटात नूपुर शहाने सुवर्ण, तर प्रकाश लुंकडने कांस्य पदक पटकावले. गेम डिझाईन स्किल्स प्रकारात पंकज सिंगने सुवर्ण, सिद्धार्थ सतीशने रौप्य तर यजुर पटेल याने कांस्य पदक पटकविताना राज्य स्पर्धेत आपला ठसा उमटविला. कनिष्ठ कौशल्य श्रेणीमध्ये १७ वर्षांखालील वयोगटात अकॅडमीची विद्यार्थिनी किमया घोमन राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाली असून १८ -१९ सप्टेंबरला होणाऱ्या सुवर्णपदक स्पर्धेत ती सहभागी होणार आहे.
या स्पर्धेत राज्यातील २६३ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील १३२ युवक-युवतींनी पदके पटकावली. आता गांधीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत आणि त्यानंतर बंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी या युवक-युवतींना मिळणार आहे.