पुणे : राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य गुरुवारी सकाळी व्यसनमुक्तीचे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथे केले होते. मात्र, दुपारी इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले, ‘ज्यांच्याबद्दल मी वक्तव्य केले आहे, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागायला तयार आहे,’ असे सांगितले. त्यावर रुपाली पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ''कराडकर यांनी दारू पिऊन आक्षेपार्ह वक्तव्य केलंय असं म्हणलं तर चालेल का असं त्या म्हणाल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांनी दि. ३ फेब्रुवारी रोजी राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे विरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने लोकमतने रुपाली पाटील यांच्याशी संवाद साधला.
पाटील म्हणाल्या, कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता, सामाजिक कार्यकर्ता यांनी स्त्रियांबद्दल बेताल वक्तव्य कारण चुकीचं आहे. आणि बोलून झाल्यावर पुन्हा माफी मागणे हे बरोबर नाही. त्यांनी माफी मागितली तरी आम्ही खटला मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
''याआधी सुद्धा अनेकांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. तेव्हा गुन्हे दाखल झाले नाहीत. बंडातात्या कराडकर जे काल वाईनच्या विरोधात आंदोलन करत होते. तो त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल आमचं कोणतही दुमत नाही. पण हे करत असताना बंडातात्या यांनी स्पष्टपणे सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन नाचतात असं वक्तव्य केलं आहे. ही कुठल्या प्रकारची वृत्ती आहे. तुम्ही आंदोलन करा. तसा कायदेशीर अधिकार तुम्हाला आहे. पण कुठल्याही महिलेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा कुठलाच अधिकार तुम्हाला नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.''
मी न्यायालयात खटला दाखल केला आहे. आता त्यावर कारवाई होईलच पाहिजे. उद्या कोणीही उभं राहील महिलांबाबत असे वक्तव्य करेल. महिलांचा काही मानसन्मान आहे कि नाही. एखाद्या महिलेबाबत असं बोलणं संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचं अपमान झाल्यासारखं आहे असेही त्यांनी सांगितले आहे.