लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पायी वारीवर ठाम असलेल्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी शनिवारी पहाटे त्यांना ताब्यात घेत वडमुखवाडी चऱ्होली येथे संकल्प गार्डन येथे थांबवले होते. त्यानंतर खासगी वाहनाने त्यांना माघारी पाठविण्यात आले.
पायी वारीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना थांबविले. पायी वारी करू नये, असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, बंडातात्या आणि वारकरी पायी वारी करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वडमुखवाडी, चऱ्होली येथे संकल्प गार्डन येथे त्यांना थांबवले. याबाबत माहिती मिळताच काही वारकरी तेथे पोहोचले. त्यांनी भजन म्हणत आंदोलन केले. बंडातात्या यांच्याशी पोलिसांनी चर्चा केली. खासगी वाहनाने त्यांना माघारी पाठविण्यात आले.
आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात काही वारकरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी किंवा देहू येथे गर्दी करू नये, तसेच निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले होते. आळंदी आणि देहू येथे निर्बंध लागू केले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
कोट -
पायी वारी करीत असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर खासगी वाहनाने त्यांना माघारी पाठविण्यात आले.
- रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड