बारामती : जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी (दि २१) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.
या निर्णयाच्या निषेधार्थ बारामतीतील सर्व जैन बांधव दिवसभर आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. बंदच्या दिवशी शहरातून सकाळी १० वाजता मोर्चा निघणार आहे. त्यानंतर हा मोर्चा तीन हत्ती चौकातील श्री महावीर भवन येथून भिगवण चौक, गांधी चौक, गुणवडी चौक मार्गे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जाणार आहे. त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर जैन समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यासाठी बंदचे आयोजन करण्यात आले आहे.