पुणे : पीएमपीएमएलच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच बस तिकीट विक्रीतून पीएमपीने २ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. २८ नोव्हेंबरला रिक्षा संघटनांनी पुकारलेल्या बंदचा फायदा पीएमपी प्रशासनाला झाल्याचे यावरून स्पष्ट होते.
पीएमपी स्थापन झाल्यापासून सोमवारी सर्वाधिक १५ लाख ४७ हजार ९४६ प्रवाशांनी पीएमपीतून प्रवास केल्याचेदेखील यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे निव्वळ तिकीट विक्रीतून १ कोटी ९२ लाख ८ हजार ९६८ रुपये एवढे उच्चांकी उत्पन्न पीएमपीला मिळाले, तर पास विक्रीतून १२ लाख ६२ हजार ७५५ रुपये उत्पन्न मिळाले असून, असे एकूण २ कोटी ४ लाख ७८ हजार ७२३ रुपये पीएमपीला मिळाले. याआधी १४ नोव्हेंबर २०२२ आणि ४ जानेवारी २०१६ रोजी २ कोटी रुपयांचे दैनंदिन उत्पन्न पार करण्यात पीएमपी प्रशासनाला यश आले होते.
२८ नोव्हेंबर रोजी रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारल्याने पीएमपीने दैनंदिन संचलनात असलेल्या बसेस व्यतिरिक्त १०० जादा बसेस पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी संचलनात आणल्या होत्या. त्यामुळे सोमवारी १,७४० बस संचलनात होत्या. दैनंदिन प्रवासी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी पीएमपीच्या बससेवेवर दाखविलेला विश्वास आहे. प्रवाशांनी पीएमपीच्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी इलेक्ट्रिक बस व सीएनजी बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.