पुणे, दि. 16 - सेन्सॉरशिपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा हा फक्त मूठभर कलावंतांसाठी राहिला नसून त्यामध्ये प्रेक्षकांनाही स्वातंत्र्य मिळायला हवे त्यांच्या अभिव्यक्तीवर अजिबात बंधने नको, असे मत ज्येष्ठ कलावंत अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान आयोजित रंगभान २०१७ या कार्यशाळेच्या मराठी नाटक आणि दृश्यत्मकता याविषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी निखिल राणे फाऊंडेशनच्या अश्विनी राणे, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत, रंगभानचे अशोक कुलकर्णी, प्रमोद काळे व सर्व सदस्य उपस्थित होते.
अमोल पालेकर म्हणाले, सेन्सॉरशिप म्हणजे आपण एका समितीला आम्ही काय सादर करणार आहोत हे दाखवतो ती समिती ते सादरीकरण योग्य आहे की नाही हे पाहते आणि सादर करण्यासाठी प्रमाणपत्र देते. नाटकाची सेन्सॉरशिप ही महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना लागू आहे. इतर राज्यात नाटक करताना कायदा आणि सुव्यवस्था हा अडथळा येत नाही परंतु महाराष्ट्रात नाटक करताना कायदा, सुव्यवस्था आणि नैतिकता यामुळे हिंसाचार वाढेल का?,असे प्रश्न सेन्सॉरशिपशी जोडले गेल्यामुळे कलावंत आणि प्रेक्षकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावे यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि हे एक सेन्सॉरशिपसाठी उचलले गेलेले मोठे पाऊल आहे. मराठी नाटके ही प्रवासी नाटकाप्रमाणे विकसित होत गेली. पण त्यामध्ये नैपथ्याचा विचार केला जात नाही. आपण आपल्याला सोयीस्कर नैपथ्य तयार करतो आणि रंगमंचावर दाखवतो. पण यातून दृश्यत्मकता दिसून येत नाही. साधारणतः मराठी नाटकात दृश्याचा विचार झाला नाही. एका बाजूने मराठी नाटकातील विषय, आशय, विविधता यामध्ये खूप काही नवीन सांगण्याची क्षमता आढळते त्याचप्रकारे दृश्यात्मक प्रभाव हा विरोधी दिसत आहे.
राजाभाऊ नातूच्या काळात रंगमंचावरील चौकट देखणी आहे की नाही? यांच्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. प्रेक्षकांना दिवासुद्धा दिसता कामा नये, अशी दर्शनी चौकट ते रंगमंचावर देखणी दिसती का नाही इथून सुरुवात करत असे. याची जाणीव सर्व नाट्यकर्मीना नसेल तर दृष्टमतेकडे पाऊल टाकता येणार नाही. एका बाजूने वेगळाच आशय आणि त्यांच्या विरोधीचा प्रवास यात दृश्यत्मकता जागृत राहिली नाही तर हा प्रवास असच मागे जात राहील. अमराठी नाटके म्हणजे दिल्ली, कर्नाटक अशा ठिकाणी अतिशय वास्तववादी, स्वप्नरंजित विश्व उभे करणारा प्रवास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टी दृश्यत्मकत्यामधून लोकांपर्यंत पोहोचवत होती. मराठी नाटकात शब्दाच्या पलीकडे जाऊन आता सादरीकरण दृश्यात्मक पद्धतीने व्हायला पाहिजे. तसेच लेखकाने सर्व शक्यतांचा विचार करा दिवाणखानासारखी सुरुवात करू नका. रंगमंचीय भाषेचा विचार कराल तर दृश्यत्मकतेचा विचार प्रामुख्याने करा. आपण वास्तववादी वाट चालू ठेऊन इतर वाटांचा अवलंब केला तर दृष्य नक्कीच दिसून येईल. अशोक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर प्रमोद काळे यांनी सूत्रसंचालन केले.