पुणे : बाणेर गावठाणातील ११ हजार ८०० चौरस मीटर (एक लाख २७ हजार १४ चौरस फूट) क्षेत्र जैववैविध्य पार्क (बीडीपी) आरक्षणातून वगळण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आला. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविणार आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बाणेर-बालेवाडी या गावांसह अन्य २३ गावांचा समावेश पालिकेत झाल्यानंतर २००८ ते २०१५ या काळात या गावांचा विकास आराखडा (डीपी) टप्याटप्याने मान्य केला होता. बाणेर-बालेवाडी येथील सेक्टर क्रमांक १ मधील काही भागांमध्ये बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले होते. या भागातील गावठाणात पालिका हद्दीत समावेश होण्यापूर्वी नागरिकांनी घरे बांधली होती. त्याची नोंद ग्रामपंचायतीकडे झालेली होती.
परंतु, हा भाग पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर बीडीपी आरक्षणात दाखविला होता. निवासी भागावर टाकलेले बीडीपीचे आरक्षण उठविण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांनी तीन वर्षापूर्वी महापालिका आयुक्त तसेच शहर सुधारणा समितीकडे केली होती.
समितीने प्रशासनाकडून मागविलेल्या अभिप्रायात बीडीपीचे आरक्षण पडलेल्या गावठाणात निवासी घरांसोबतच पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था पथदिवे यासुविधा पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याने हा निवासी भाग आरक्षणामधून वगळावा, असा अभिप्राय तत्कालीन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला होता. प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायानंतर शहर सुधारणा समितीमध्ये निवासी भागात पडलेले आरक्षण वगळण्याचा ठराव मान्य करून हा ठराव मुख्य सभेकडे पाठविला होता. चार दिवसांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला एकमताने मान्यता देण्यात आली.
----
बाणेर गावठाणातील निवासी भागात बीडीपीचे आरक्षण पडल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत मान्य करण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे लवकरच पाठविणार आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका