पुणे : मेट्रोच्या कामामुळे बाणेर रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सकाळनगर, बाणेरफाटा येथे पदपथ बारीक केले पण, बाणेर रस्त्यावर साेमेश्वरवाडी फाटा ते गणराज चौकापर्यंत तुटलेल्या पदपथावर (फूटपाथ) मोठी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्व पदपथ कमी केले जाणार आहेत.
महापालिकेच्या पथ विभागाकडून ही कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याची सुरूवात या रस्त्यावरील दोन सॅम्पल पीस निवडण्यात आले आहे. यामध्ये बालेवाडी फाट्यापासून ते गणराज चौकापर्यंत (डाव्या बाजूने) ५०० मीटर भाग व माउली पेट्रोल पंपापासून ते अण्णा इडली या दुकानापर्यंतच्या (उजव्या बाजूने) चारशे मीटर भागातील पदपथ अतिक्रमण मुक्त करून ते कमी केले जाणार आहेत. हे पदपथ कमी करताना त्यामध्ये केबल डक्ट टाकण्याचे काम पूर्ण करणे, जलवाहिन्या बाजूला घेणे आदी कामे यात केली जाणार असून, हे पूर्ण होण्यालाही सुमारे एक महिना कालावधी लागणार आहे.
बाणेर रस्त्यावर या दोन ठिकाणी अधिकची वाहतुक कोंडी होत आहे. या दोन्ही ठिकाणी पदपथाच्या बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांनी पदपथावर मोठी अतिक्रमणे केली आहेत. यात किराणा माल विक्रेत्यांकडून रस्त्यावरच भाजीपाल्याचे रॅक लावले आहेत, तसेच पदपथांवरच वाहने पार्क केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी प्रथम कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
आदर्श रस्त्यांच्या कामाला १ ऑक्टोबरपासून मुहूर्त
शहरातील सिंहगड रस्ता, विद्यापीठ रस्त्यासह जे पंधरा रस्ते आदर्श करण्यात येणार आहेत, ते काम सुरू होण्यास १ ऑक्टोबर उजाडणार आहे. सध्या केवळ या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, अतिक्रमणे काढणे ही कामे केली जात आहेत. पावसाळा असल्यामुळे या रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करणे शक्य नाही. तसेच आताच्या सिमेंटच्या रस्त्यावरही पावसामुळे खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर केला जात आहे. पण हे डांबरीकरण पावसामुळेही तीन-चार दिवसांत उघडले जात असल्याची कबुली महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.