पुणेः मनसेनं काल पुण्यात पकडलेले बांगलादेशी हे राज ठाकरेंविरोधात न्यायालयात जाणार आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमुळे प्रचंड मनस्ताप झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात ते आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात एक मोहीम राबवली होती. बांगलादेशी सर्च मोहीम, बांगलादेशी घुसखोर, अशा पद्धतीची ही मोहीम राबवण्यात आली होती.सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील इमारतींमध्ये फिरून घुसखोर बांगलादेशी शोधण्याची मोहीम सुरू होती. त्यावेळी घटनास्थळी सहकारनगर पोलीसही हजर होते. सुमारे 50 मनसे कार्यकर्ते परिसरात फिरून घरांमध्ये कागदपत्रांची मागणी आणि तपासणी करत होते. मनसेच्या कार्यकर्त्यांना माहिती असलेल्या बांगलादेशींच्या घरातही ते घुसले होते. त्यांना घरातून बाहेर काढलं. तुम्ही तुमची कागदपत्रं दाखवा अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. जर एखाद्याकडे कागदपत्रे नसतील तर त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठवण्याची मागणी मनसेने केली होती. त्यानंतर त्या बांगलादेशींना पोलीस स्टेशनमध्येही घेऊन जाण्यात आलं होतं.तसेच त्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व असल्याची पोलिसांनी खातरजमा केली. त्यांच्याकडे भारताचे नागरिक असल्याचे अनेक कागदपत्रं पुराव्याच्या स्वरूपात होते. आता त्याच स्वारगेटजवळील सहकार नगरच्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये या बांगलादेशींनी मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात आणि राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या बांगलादेशींनी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही या बांगलादेशींनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे, बोरिवली भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. ठाण्यातील किंगकाँगनगर येथे राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबाना पकडून मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिले होते. स्थानिकांकडून याची माहिती मिळताच मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत सदर ठिकाणी पोहोचले. त्यानंतर येथे राहणाऱ्यांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड असल्याची माहिती समोर आली. मात्र त्यांच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट आढळून आल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली होती.
मनसेनं पकडलेले 'ते' बांगलादेशी नागरिक मनसैनिक अन् राज ठाकरेंविरोधात न्यायालयात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 8:47 PM
बांगलादेशी सर्च मोहीम, बांगलादेशी घुसखोर, अशा पद्धतीची ही मोहीम राबवण्यात आली होती.
ठळक मुद्देमनसेनं काल पुण्यात पकडलेले बांगलादेशी हे राज ठाकरेंविरोधात न्यायालयात जाणार आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमुळे प्रचंड मनस्ताप झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. बांगलादेशी सर्च मोहीम, बांगलादेशी घुसखोर, अशा पद्धतीची ही मोहीम राबवण्यात आली होती.