वडगाव कांदळी: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे तीन अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशिन व इतर चार दुकाने फोडली होती. आळेफाटा पोलिसांनी तपास करुन दोघा जणांना ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. आळेफाटा पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी पिंपळवंडी येथील बँक आँफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मध्ये पैसे नसल्यामुळे या चोरट्यांच्या हाताला काही लागले नव्हते. त्यानंतर त्यांनी पिंपळवंडी स्टॅन्ड येथील लक्ष्मी खानावळ या हाॅटेलच्या शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. हाॅटेलमधील किरकोळ चिल्लर व शितपेयाच्या बाटल्या चोरी केल्या होत्या. त्यानंतर कार्यालय आणि मोटार वायंडिंग, किराणा मालाच्या दुकाने या सर्वांची कुलूप तोडून त्याठिकाणीही चोरी केली. त्यामध्ये किरकोळ वस्तू आणि काही रक्कम चोरीला गेल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाले होते. या फुटेजच्या आधारे आळेफाटा पोलिसांनी तपास करुन राजेंद्र जाधव व कैलास काळे ( दोघेही रा.गुरेवाडी,) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या घटनेमधील एक आरोपी संतोष उर्फ विजय जाधव फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिस नाईक निलकंठ कारखेले आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आळेफाटा पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसात या घटनेचा तपास करुन आरोपींना अटक केल्याबद्दल आळेफाटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.