पुणे: आयसीआयसीआय आणि एचडीएफएस बँकेतील पाच डॉरमंट खात्यातील 216 कोटी 29 लाख रुपये लंपास करण्याचा कट पुणेपोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्यानंतर आता या कटाचे आणखी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींकडील प्राप्त डेटामधील बँक खाती मुंबई, हरियाणा,चेन्नई व हैद्राबाद येथील असल्याचे तपासात समोर आले असून, पाच खात्यापैकी ज्या निष्क्रीय (डोरमंट) खात्यात 100 कोटी रुपये पडून आहेत, ते खाते हरियाणा येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
देशभरातील नागरिकांच्या बँक खात्याची गोपनिय माहिती मिळवल्यानंतर त्याची विक्री करून आर्थिक फसवणूक करण्याची तयारी आरोपींनी केली होती. ज्या बँक खात्यातून आरोपी पैसे इतरत्र वळविणारे होते त्या मोठया व्यवसायिक कंपनीचे पाच खातेधारकांना पुणे पोलीसांचे सायबर गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.19)लेखी पत्र पाठवत, संबंधित बँक खातेबाबत माहितीची विचारणा केली आहे.
दरम्यान, सदर गुन्हयातील आरोपींचे संर्पकात असलेली स्टॉक ब्रोकर अनघा मोडक ही बँकाचा डॉरमेंट खात्याची जबाबदारी सांभाळत असलेल्या काही जणांच्या संर्पकात होती. गोपनीय डाटा मिळवून सायबर हॅकरच्या मदतीने संबंधित निष्क्रीय बँक खात्यातील पैसे इतरत्र वळविणे याकरिता ती आर्थिक अडचणीत असलेल्या मोठया व्यवसायिकांना संपर्क करत होती. या व्यवहारात होणाऱ्या डीलकरिता तिला कमिशन म्हणून अडीच कोटी रुपये पाहिजे होते व त्यातून तिला तिची कोटयावधी रुपयांची देणी फेडायची होती. हैद्राबाद,सुरत, मुंबई, लातूर, औरंगाबाद याठिकाणी पुणे पोलीसांची पथके तपासकामी रवाना झाली आहेत. ती पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत आहे. मात्र हे वृत्त प्रसिद्ध झााल्याने मूळ आरोपी हे सतर्क झाले असून, ते फरारी झाले असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचसोबत गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कार्यालये व घराची झाडाझडती घेतली जात आहे. यावेळी लॅपटॉप,हार्डडिस्क, मोबाईल, पेनड्राईव्ह असा इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला असून त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे.