पुणे : बनावट सोने तारण ठेवून २ लाख ९७ हजार रुपयांचे कर्ज मिळवून डीसीबी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मूल्यांकनकाराला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. सुधीर बी. डहाळे (रा. वडगावशेरी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी अशरफ अयुब खान (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीबी बँकेच्या ढोले-पाटील शाखेचे व्यवस्थापक दिनकर शेनॉय (वय ५२, रा. कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ३० जानेवारी २०१३ ते २६ जून २०१४ या कालावधीत घडली. सुधीर डहाळे डीसीबी बँकेचे सोन्याचे व्हॅल्युएशन करणारे सोनार म्हणून काम पाहत होते. बँकेत अश्रफ खान याने सोन्याच्या दहा वेढण्या गहाण ठेवण्यासाठी दिल्या. डहाळे याने त्यातील सोने पाहून त्याचे मूल्य ३ लाख २५ हजार ३६३ रुपये असल्याचे सांगितले. त्यानुसार बँकेने खानला २ लाख ९७ हजार रुपयांचे कर्ज दिले. मात्र, तो कर्जफेड करीत नसल्याने आणि मुद्दल भरत नसल्याने बँकेने त्याच्या पत्त्याची चौकशी केली. तेव्हा तो सापडला नाही. त्यानंतर बँकेने नियमानुसार सोने लिलावासाठी जाहिरात देऊन ते सोनारामार्फत तपासून पाहिले. तेव्हा त्या वेढण्या सोन्याच्या नसल्याचे आढळले. डहाळे आणि खान यांनी संगनमत करून कर्ज मिळवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सुधीर डहाळे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. रक्कम जप्त करायची असून खानला अटक करण्यासाठी डहाळे यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ए. के. पाचरणे यांनी न्यायालयाला केली. ती मान्य करून न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़
बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक
By admin | Published: December 22, 2016 2:43 AM