पुणे : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्रने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना सहकर्ज (को-लेंडिंग) देण्यासाठी पुणे येथील मेसर्स लोन टॅप क्रेडिट प्रोडक्टस प्रायव्हेट लिमिटेड ह्या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीसोबत दूरगामी सहकार्य करार केला आहे. को-लेंडिंग अंतर्गत प्रारूपानुसार कर्जदाराच्या सोयीनुसार डिजिटल कर्ज माध्यामावरून कर्ज मंजूर करून घेण्याची सुविधा
असून त्यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ग्राहकांचे प्राथमिक कर्ज प्रक्रियेपासून ते कर्ज वितरण आणि संनियंत्रणापर्यंत ऑन-बोर्डिंग होणार आहे. या सहकर्ज प्रारूपानुसार बँकेचे उद्भासन (एक्स्पोजर) ८० % पर्यंत
असून उर्वरित रक्कम लोन टॅपतर्फे देण्यात येईल.
आतापर्यत कर्जापासून वंचित असलेल्या व कमी कर्ज वितरण झालेल्या क्षेत्रांकडे कर्ज प्रवाह वाढविण्यासाठी व अंतिम लाभार्थ्याला परवडणाऱ्या किमतीला निधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकर्ज प्रणालीची
सुरुवात केल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी संगितले.
सहकर्ज प्रारूपामुळे प्राधान्य क्षेत्राचे कर्जवाटप उद्दिष्ट गाठण्यात बँकेला मदत होईल असे बँकेचे
कार्यकारी संचालक हेमंत टम्टा यांनी सांगितले. या प्रारूपाचा सर्वांनाच लाभ होईल. कमी व्याजदराने बँकांकडून कर्ज मिळून ग्राहकांना अधिक लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.