लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचा ८६ वा व्यवसाय प्रारंभ दिन मुख्य कार्यालयासह सर्व विभागीय कार्यालये व शाखांमध्ये सोमवारी (दि. ८) साजरा झाला.
बँकेच्या लोकमंगल मुख्यालयातील कार्यक्रमास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव, कार्यकारी संचालक हेमंत टम्टा, भारतीय रिझर्व बँकेचे नामनिर्देशित संचालक एम. के. वर्मा आदी या वेळी उपस्थित होते.
व्यवसाय प्रारंभदिनी, बँकेने तंत्रज्ञानावर आधारित अनेक सेवा सुरू केल्या आहेत. यात सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी डिजिटल कर्ज वितरण सेवा, अंतर्गत कर्ज जोखीम मूल्यांकनासाठी एकिकृत जोखीम व्यवस्थापन संकेतस्थळ (पोर्टल)
‘आयकॉन’, चॅनेल वित्त साहाय्य सेवा, ऑनलाईन खाते उघडण्यासाठी सेवा त्वरित लॉकर सुविधा इत्यादींचा त्यात समावेश आहे.
ए. एस. राजीव म्हणाले, “संपूर्ण अर्थव्यवस्था सर्वांत कठीण काळातून जात असताना आणि बँकिंग उद्योगाची वाढ ५ ते ६ टक्क्यांनी होत असताना बँक ऑफ महाराष्ट्रचा व्यवसाय १० ते १२ टक्के दराने वाढावा, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. बँकेच्या डिजिटल योजनांमुळे आपल्या सर्वसमावेशक वाढीला एक नवा आयाम मिळाला असून येणाऱ्या तिमाहीमध्ये एक मध्यम आकाराची मजबूत व भक्कम बँक म्हणून पुढे येण्यास आपण सज्ज आहोत.”
हेमंत टम्टा म्हणाले की, गुणवत्तेवर आधारित कर्ज वितरण, चालू व बचत ठेवी खात्यांचे प्रमाण ५२ टक्क्यांपर्यंत वाढवणे, वसुली प्रक्रिया बळकट करणे, अधिक खाती एनपीए न होऊ देणे, बिगर व्याज उत्पन्न निगमित संप्रेषण व निवेशक संबंध वाढविणे व ग्राहक सेवेत सातत्याने सुधारणा अशा पंचासूत्रीच्या कामात अवलंब केला पाहिजे.