पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोंढवा शाखेतील व्यवस्थापकाने इतर अधिकाऱ्यांच्या पासवर्डचा वापर करून तब्बल ३० लाख ९३ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ शालिवाहन मुकुंद सोलेगावकर असे या शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे़. याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे विभागीय अधिकारी संजीव नारखेडे (वय ५९, रा़ कोथरुड) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील महाराष्ट्र बँकेत हा प्रकार १७ जानेवारी ते १० मे २०१८ दरम्यान घडला़. सोलेगावकर हे बँकेचे जुने अधिकारी असून कोंढवा येथे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करीत होते़. त्यांनी बँकींग ट्रान्झेक्शन व इव्हीव्हीएसचे काम करत होते़. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन शाखेतील दोन अधिकाऱ्यांचा पासवर्ड वापरुन एकूण ७४ इंन्ट्रीजद्वारे इन्टरेस्टे पेड आॅन टर्म डिपॉझिट खात्यातून ३० लाख ९३ हजार ५०० रुपये एका व्यक्तीच्या खात्यात परस्पर हस्तांतरीत केले़. या ३० लाख रुपयांपैकी २२ लाख एका खात्यात तर स्वत:च्या अन्य दोन खात्यात ६ लाख ६० हजार हस्तांतरीत केले़. त्यापैकी २२ लाख रुपये त्यांनी वेळोवेळी एटीएमद्वारे काढले़. कोंढवा शाखेतील एक महिला अधिकारी यांना आपण न केलेल्या एन्ट्रीज आपल्या नावावर दिसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले़. त्यांनी ही बाब शाखा व्यवस्थापक सोलेगावकर यांना सांगितली़. तेव्हा त्यांनी मी पाहून घेतो, तुम्ही काळजी करु नका असे उत्तर दिले़. त्याने त्याचे समाधान न झाल्याने या महिला अधिकाऱ्यांनी विभागीय अधिकारी संजीव नारखेडे यांना याची माहिती दिली़. त्यानंतर नारखेडे यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला़. सोलेगावकर यांना बँकेने निलंबित केले असल्याचे पोलिसांनी सांगितले़. पोलीस उपनिरीक्षक के़ के़ कांबळे अधिक तपास करीत आहेत़.
बँक व्यवस्थापकानेच घातला ३० लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 4:40 PM
कोंढवा शाखेतील बँकेच्या व्यवस्थापकाने इतर अधिकाऱ्यांच्या पासवर्डचा वापर करून तब्बल ३० लाख ९३ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
ठळक मुद्देसजग महिला अधिकाऱ्यामुळे प्रकार उघडकीस