पुणे : बँकिंग क्षेत्रात सेवा देताना ग्राहकांना अचूकता, पारदर्शकता आणि वेग या गोष्टी आवश्यक असतात. त्याकरिता काळानुसार बँकिंगमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला. तंत्रज्ञानामुळे व्यवहार आणि सेवांमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हॅकिंगसारख्या विचित्र गोष्टींमुळे अनेक अडचणी समोर आल्या. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑनलाइन पारदर्शकतेकरिता काही गोष्टी सांगितल्या. त्यांचा अवलंब करण्याबरोबरच बँकांमध्ये विश्वासार्हतेसोबत सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृती करण्याकरिता तसेच बँकांच्या सुरक्षा यंत्रणा बळकटीकरणाविषयी परिषदेचे आयोजन सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेल येथे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, उपनिबंधक दिग्विजय राठोड, असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड. साहेबराव टकले, मानद सचिव संगिता कांकरिया, संचालक सुनील रुकारी, डॉ. अशोक शिलवंत, नीलेश ढमढेरे, मंगला भोजने, रमेश वाणी, बाळकृष्ण उंदरे, विनायक तांबे, अॅड. अमित निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे उपस्थित होते. अनिल कवडे म्हणाले, काही अघटित घटनांमुळे सहकार चळवळीला गालबोट लागले. त्यामुळे सायबर सिक्युरिटीसारख्या विषयावर प्रशिक्षण उपक्रम राबविणे, हे आवश्यक आहे. बँकांसाठी असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीप्रमाणेच चांगली मूल्ये व व्यवहारांमधील नैतिकतेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. विद्याधर अनास्कर म्हणाले, बँकिंगसह सर्वच क्षेत्रात आज कमविण्यापेक्षा सांभाळणे हे महत्त्वाचे झाले आहे. नफा कमविण्यापेक्षा नीट सांभाळण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. आज बँकिंग क्षेत्रात ‘सायबर सिक्युरिटी’ हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृती ही काळाची गरज आहे. अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांतील सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने डिसेंबर २०१९ मध्ये सविस्तर सूचना दिल्या आहेत. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. साहेबराव टकले यांनी आभार मानले.
फोटो ओळ : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृती करण्याकरिता तसेच बँकांच्या सुरक्षा यंत्रणा बळकटीकरणाविषयी परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना (डावीकडून) नारायण आघाव, दिग्विजय राठोड, विद्याधर अनास्कर, अॅड. साहेबराव टकले, अनिल कवडे, अॅड. सुभाष मोहिते, संगीता कांकरिया.