पुणे: आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा एक उत्कृष्ट उपक्रम असून, याच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले. एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा आणि खरेदीला जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवण्याचा सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहनही केले.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. लोककला अभ्यासक डॉ.प्रकाश खांडगे, पालखी पदाधिकारी बाबा होनमाने, जय़ंत चतुर यावेळी उपस्थित होते.
ढाकणे म्हणाले, प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारणे आवश्यक आहे.या वारी दरम्यान शक्य तेथे मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात येऊन वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचे प्रश्न हे व्यापक असल्याने वारीत सहभागी होणाऱ्या दहा लाख वारकऱ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी गेल्या चौदा वर्षापासून 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' हा अभिनव उपक्रम सुरू आहे. याद्वारे पर्यावरण संरक्षण व संवर्धनात लोकजागृतीचे पुढचे पाऊल टाकले जात आहे.
बांबू लागवड, वृक्षतोड टाळाचा संदेश
या उपक्रमात राज्य शासनाने घेतलेल्या एकल वापराचे प्लास्टिक बंदी बाबत व्यापक जनजागृती, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे, विजेची बचत, पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन, वृक्षतोड टाळणे आणि बांबू लागवडीबाबत संदेश देण्यात येणार आहे.