पुणे : ‘शेड्युल्ड १’च्या यादीत असलेल्या कासवांना हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी तळेगाव येथील एका हॉटेलचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पाठीवर शेलसारखे कवच (Indian roofed turtle) असलेल्या कासवांना पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे. संबंधित हॉटेलमध्ये कासव असल्याची माहिती वन विभागाला मिळाली आणि त्यांनी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
हे कासव दुर्मीळ असून, ते शेड्यूल्ड १ यादीत आहे. त्यामुळे त्याला पाळणे भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा आहे. या कासवाच्या शेलच्या सर्वात वरच्या भागावर छप्परसारखे दिसते. त्या नावाने ते ओळखले जाते. दक्षिण आशियातील प्रमुख नद्यांमध्ये ते आढळते. भारतीय उपखंडातदेखील असते.
पुण्याचे मानद वन्यजीव रक्षक (वाइल्डलाइफ वॉर्डन) आदित्य परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याचे मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी एच. ए. जाधव व वन परिमंडळ अधिकारी मल्लिनाथ हिरेमठ, वनरक्षक योगेश कोकाटे, परमेश्वर कासुळे व जांभूळकर यांच्या पथकाने धाड टाकली. ही कासवे मौजे तळेगाव येथील मनोहरनगर परिसरात श्रीशा हॉटेलमधील फिश टँकमध्ये विनापरवाना ठेवलेली होती. तत्काळ या वन्यजीवांना ताब्यात घेतले व संबंधित घटनेतील आरोपी अभिजित राजेंद्र पठारे (वय ३०, रा. काळे मळा, चांदोली खुर्द, ता. आंबेगाव) यांच्यावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा नोंद करून ताब्यात घेतले.
कसे असतात हे कासव?
या कासवाचे कवच तपकिरी, कधी कधी पिवळी किंवा केशरी किनार असलेले असते. ज्यामध्ये लाल ते नारिंगी मध्यवर्ती पट्टे असतात. पृष्ठीय बाजूने त्याचे डोके काळे असते आणि पाठीवर नारिंगी ते पिवळसर-लाल डाग असतात. जबडा पिवळा असून, मान काळी असते. त्यावर अनेक पिवळे पट्टे असतात. हातपाय ऑलिव्ह ते राखाडी आणि ठिपकेदार आणि पिवळ्या रंगाचे असतात.
हे कासव आकाराने एक ते दीड फुटांपर्यंत मोठे होतात आणि त्यांचे वजन २५ किलोपर्यंत असते. अशा कासवांना पाळणे कायद्याने बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे कृत्य करू नये.
- आदित्य परांजपे, मानद वन्यजीव रक्षक, पुणे