पुणे : ऐन गर्दीच्या वेळी पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईत बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी संध्याकाळी पावसाळी हवेमुळे शहरात वादळी वारा सुटला होता. त्यात आठवड्याचा शेवट असल्याने मंडईतही गर्दी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या बॅनरवर अखिल पुणे शहर रामनवमी उत्सव असं नाव आहे. संबंधित महिला खरेदीसाठी मंडईत आल्या होत्या. त्यांच्यासोबत लहान मुलगीदेखील होती. अचानक बॅनर डोक्यावर कोसळल्यामुळे डोके फुटून रक्तबंबाळ झाले होते.
काही नागरिकांनी त्यांना रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. मात्र हे बॅनर कोणी लावले, अनधिकृत आहे की अधिकृत याबाबत अजून तरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याच भागात असलेल्या राममंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. सुदैवाने हा अपघात कोणाच्याही जीवावर बेतला नाही. मात्र बॅनर, फ्लेक्स किंवा होर्डिंगच्या बाबतीत महापालिका गंभीर होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सहा महिन्यापूर्वी मंगळवार पेठ भागातील शाहीर अमर शेख चौकतील अपघाताच्या आठवणी यामुळे जाग्या झाल्या आहेत.