Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे अजित पवार हे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या साखर कारखान्यावरही आयकर विभागानं कारवाई केली होती.
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याशी संबंधित काही व्यक्तींच्या साखर कारखान्यांवर आणि त्यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागानं (Income Tax) छापे टाकले होते. परंतु त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. दरम्यान, यानंतर आता पुण्यात अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आलं आहेत. या बॅनरमध्ये त्यांच्या हातात तलवार दिसून येत आहे. सध्या हा लावण्यात आलेला बॅनर हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात अजित पवारांच्या समर्थनार्थ नगरसेवक युवराज बेलदरे यांनी हा बॅनर लावला आहे. "जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीकडे खेळणाऱ्या पहिलवानचा नाद करू नये. समझने वालों को इशारा काफी है," असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. तसंच यासोबत अजित पवार यांचा हातात तलवार घेतलेला फोटोही आहे.
किरीट सोमय्यांनी केले होते आरोपठाकरे आणि पवारांना आता निरोप देण्याची वेळ आली आहे. किरीट सोमय्या हे फक्त नाव नसून चळवळ आहे. तुम्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. कितने आदमी थे नाही तर पवार साहेब कितने पैसे है, गिन गिन के हिसाब लेंगे असं म्हणत किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक पवार कुटुंबीय आहेत. सात कंपन्यांनी कारखाना ताब्यात घेतला आहे. बहिणींच्या नावाने अश्रू ढाळू नका, अजित पवार व पवार कुटुंबीय आता उत्तर द्या, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी थेट अजितदादांना चॅलेंज केलं होतं.
जरंडेश्वर सह अजित पवारांच्या ७० बेनामी मालमत्ता त्यांच्या बहिणीसह मेहुण्याच्या नावावर आहेत. या चोरीच्या मालमत्ता अजित पवार परत करणार का? ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल असलेल्या शरद पवारांनी याचं उत्तर द्यावं, असंही ते सोमय्या म्हणाले होते.