लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : व्यावसायिकांनी गिळंकृत केलेले पदपथ.. फेरीवाले, हातगाडीवाले यांनी थेट रस्त्यावर केलेले अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे पादचारी व वाहनचालकांची उडणारी गाळण... हे चित्र आहे बाणेर फाट्याकडून परिहार चौकाकडे, परिहार चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे, आंबेडकर चौकातून हॉटेल सीझन्सकडे जाणाऱ्या रस्त्यांवरचे महापालिका व वाहतूक विभागाने याकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केल्याने येथील समस्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे.अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या बाणेर रस्त्याने मागील मागील महिन्यात मायलेकींचे प्राण घेतले. तो धडा घेऊन त्यानंतर तरी पालिका प्रशासन तसेच वाहतूक विभाग जागे होऊन या रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात ठोस भूमिका घेतील, अशी येथील रहिवाशांची अपेक्षा होती. मात्र, पालिका व वाहतूक प्रशासनाने याकडे साफ डोळेझाक केली आहे. परिणामी, या परिसरातील रहिवाशांची घुसमट कायम राहिली. या रस्त्यांलगत असणाऱ्या सोसायट्यांमधील ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. वाहनचालकांनाही अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे.या रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या भाऊगर्दीत रस्ते अगदी हरवून गेले आहेत. त्यातून वाट काढताना हाल होतात. वीकेंडला त्यात अधिकच भर पडते. दुकान व्यावसायिक आपले व्यवसाय थेट पदपथावर मांडतात. येथील रस्त्यांवर लावल्या जाणाऱ्या वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ होते. वाकड्यातिकड्या स्वरूपात बेजबाबदारपणे लावल्या जाणाऱ्या या वाहनांमुळे डोकेदुखीत भर पडते. परिणामी, वाहतूककोंडीसारख्या समस्या उद्भवतात.
अतिक्रमणांच्या विळख्यात बाणेर रस्ता
By admin | Published: June 30, 2017 3:57 AM