पुणे : कोथरूड येथील अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या महात्मा सोसायटीत रानगवा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. वनविभाग आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पौड रस्त्यावरील भारतीनगर सोसायटी परिसरात रानगवा जाळ्यात अडकला होता. त्यानंतर तो भुलीच्या इंजेक्शनमुळे बेशुध्द पडला. वन विभागाने त्याला गाडीतून नेले पण काही वेळातच त्याने आपले प्राण गमावले होते. त्याच्या मृत्यूला माणसांची गर्दी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
मात्र, माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर आता पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात लागले आहे. एका पुणेकराने त्या गव्याची प्रतिकृती तयार करत त्याची माफी मागितली आहे. तसेच पुणेकरांसाठी एक संतप्त संदेश देखील दिला आहे. गिरीश मुरुडकर यांनी पासोड्या विठोबाजवळील मुरुडकर झेंडेवाले या दुकानात रानगव्याची प्रतिकृती उभारली आहे.
भारत फ्लॅग फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी मुरुडकर झेंडेवाले या पासोड्या विठोबाजवळील दुकानात ही प्रतिकृती उभारली आहे. 'घटनेचे गांभीर्य ओळखुया, निसर्गात ढवळाढवळ थांबवूया' असा संतप्त संदेश प्रतिकृतीजवळ लावला आहे. पुणेकरांची नजरा ही प्रतिकृती वेधून घेत आहे.
बुधवारी पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली होती. गवा रस्ता चुकल्यामुळे बिथरला होता. तो शेजारीच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून आल्याचा अंदाज वर्तवत पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले होते. रेस्क्यू ऑपरेशनानंतर गव्याला ताब्यातही घेतले. मात्र, काही वेळातच रानगव्याचा मृत्यू झाला. पुण्यातील या रानगव्याच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी सोशल मीडियात वाऱ्यासारखी पसरली होती. अनेकांनी यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करत पुणेकरांच्या या अक्षम्य चुकीवर बोट ठेवत जोरदार टीका केली होती.काहींनी तुम्ही त्यांच्या जंगलात शिरलात, ते तुमच्या घरात शिरले, असे म्हणत त्यांची व्यथाही मांडली होती.
मात्र, कोथरूडमध्ये रानगव्याने माणसांच्या गर्दीला, पाठलागाला घाबरून कोथरूडमध्ये रानगव्याने प्राण गमावल्यावर हळहळ व्यक्त होत आहे. 'आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत ' असे शब्द लिहिलेले बॅनर लावून मुरुडकर यांनी पुणेकरांच्या भावना व्यक्त केल्या आहेत . 'जंगले राखुया , वन्यजीव जगवूया' असा संदेशही गिरीश मुरुडकर यांनी प्रतिकृतीजवळ लिहिला आहे.