पुणे तिथे काय उणे! निकालपूर्वीच लागले विजयाचे बॅनर; भाजपासह MVA च्या उमेदवारांचा विजयाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 11:04 AM2024-05-15T11:04:43+5:302024-05-15T11:21:24+5:30
१३ तारखेला (सोमवारी) या लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडले. मतदानानंतर आता दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात आहे....
पुणे : सोमवारी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघासाठी लोकसभेचे मतदान पार पडले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान झाले. या तीनही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. पुण्यातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी चांगली लढत दिली. तर बारामतीत नणंद-भाऊजयची लढत लक्षवेधी ठरली. शिरुरमध्ये विद्यमान खासदार आणि माजी खासदारांमध्ये लढत होती. १३ तारखेला (सोमवारी) या लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडले. मतदानानंतर आता दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात आहे.
'कर्वे रोड ते कर्तव्य पथ'-
मतदानानंतर शहरात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून विजयाचे बॅनर झळकवण्यात येत आहेत. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर शहरात लावले. पुण्यातील बाणेर परिसरात हा बॅनर लावण्यात आलेला आहे. या बॅनर वर 'कर्वे रोड ते कर्तव्य पथ' असा आशय आहे. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यासह पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक सनी निम्हण यांचाही फोटो लावण्यात आला आहे. मोहोळांच्या नावाअगोदर खासदार या शब्दाचा उल्लेख करत भाजपा पदाधिकाऱ्यांकडून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
'गुलाल आमचाच', मविआचा दावा-
तर दुसरीकडे पुणे शहरात महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया फ्रंटचे उमेदवार सुप्रियाताई सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांच्या विजयाचेही बॅनरही लावण्यात आले आहेत. यामध्ये 'गुलाल आमचाच' असं म्हणत महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. हा बॅनर अमित आबा बागूल आणि मित्र परिवारातर्फे लावण्यात आला आहे.
पुण्यात ५३.५४ टक्के तर शिरूर मतदारसंघात ५४.१६ टक्के मतदान-
जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांत झालेल्या मतदानाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एकूण मतदान ५३.५४ टक्के; तर शिरूर मतदारसंघात ५४.१६ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. त्यामुळे पुणे मतदारसंघात गेल्या वेळच्या तुलनेत सुमारे चार टक्क्यांची वाढ झाली. शिरूरमध्ये सव्वापाच टक्क्यांची घट झाली आहे.
मागील निवडणुकीत अर्थात २०१९ मध्ये पुण्यात ४९.८७ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानात ३.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण मतदान ११ लाख ३ हजार ६७८ झाले असून, त्यात ५ लाख ८४ हजार ५११ पुरुष; तर ५ लाख १९ हजार ७८ महिला व ८९ तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला. यात ९ लाख ५७ हजार ५९८ मतदारांनी कर्तव्य बजावले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वाधिक २ लाख ४१ हजार ८१७ मतदार वडगावशेरीतील असून, सर्वात कमी १ लाख ४१ हजार १३३ मतदार शिवाजीनगरमधील आहेत. कोथरूडमध्ये २ लाख १७ हजार ४५५, पर्वतीत १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये १ लाख ४९ हजार ९८४ आणि कसबा पेठ मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदारांनी मतदान केले.