पुणे : भाजपाचे सलग पाचव्यांदा निवडून आलेले आमदार गिरीश बापट आणि दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले दिलीप कांबळे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची चर्चा आज दिवसभर कार्यकर्त्यांमध्ये होती. तर, राज्यातून राष्ट्रीय समाज पक्षातून एकमेव निवडून आलेले दौंडचे आमदार राहुल कुल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पुणेकरांनी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांना कौल दिला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी पुण्यावर खूष आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या श्रेष्ठींची बैठक मुंबईत आज झाली. त्या वेळी शहरातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे जुळत भाजपा सत्तेचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील भाजपाच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपदे मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे. कसबा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आलेले गिरीश बापट हे सर्वाधिक अनुभवी आमदार आहेत. लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच, विधिमंडळाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. पुण्यातील एक अभ्यासू आमदार म्हणून ते परिचित आहेत. मंत्रिमंडळातील महत्त्वाचे अर्थ व महसूल खात्यापैकी एक त्यांना मिळण्याचा दावा भाजपाचे कार्यकर्ते करीत आहेत. १९९५ मध्ये राखीव असलेल्या पर्वती मतदारसंघातून दिलीप कांबळे विजयी झाले होते. त्या वेळी त्यांना समाजकल्याण मंत्री म्हणून संधी मिळाली होती. (प्रतिनिधी)
मंत्रिपदासाठी बापट, कांबळे चर्चेत?
By admin | Published: October 21, 2014 5:10 AM