पुणे : शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे मोफत शिक्षण सुविधा पुरवणे ही शासनाची जबाबदारी असतानाही शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे बालगंधर्व चौकात निदर्शने करण्यात आली. बाप्पा, जावडेकरांना बुद्धी दे, शिक्षण हक्काची जाण दे, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. हम अपना हक माँगते, नही किसीसे भीख माँगते, भीख नाही, हक्क द्या, दिल्ली मॉडेल शिकून घ्या अशा घोषणांनी निषेध व्यक्त करण्यात आला. पदाधिकारी मुकुंद किर्दत, सैद अली, आनंद अंकुश व अनेक कार्यकर्ते सामील झाले होते.सरकारची जबाबदारी असलेल्या शैक्षणिक सुविधांसाठी शासनाकडे मागितलेले अनुदान, सोई ही भीक नव्हे. कटोरा घेऊन शाळा येतातही भाषा स्वत:ची जबाबदारी नाकारणारी, असभ्य आणि सत्तेचा माज दर्शवणारी आहे, असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले. जावडेकर यांच्या घराबाहेर आंदोलनाकरिता विविध संघटना, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सुरक्षेकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.माझे शब्द मागे घेतो... : प्रकाश जावडेकरसरकार शिक्षणावर खर्च करणार नाही आणि माजी विद्यार्थ्यांनीच खर्च करावा, असे म्हणण्याचा माझा मुळीच अर्थ नव्हता. यापुढे सरकार शिक्षणावर अधिकाधिक खर्च करेल. गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने ७० टक्के शिक्षणावरील तरतूद वाढविली आहे. माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या शाळा, कॉलेज या संस्थांच्या विकासामध्ये योगदान केले पाहिजे.हा भाषणाचा मूळ आशय आहे. शिक्षणासाठी मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ज्ञान प्रबोधिनी शाळा चालविण्यासाठी त्यांचे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर मदत करतात, ही चांगली घटना आहे. याचे उदाहरण देऊन वक्तव्य केले होते. भाषणात वापरलेला भीकेचा कटोरा हा शब्द चुकीचा असून, तो मी मागे घेत असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.जावडेकरांविरोधात पोस्टरबाजीपुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने रविवारी (दि. १६) शहरात पोस्टरबाजी केली. मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी फर्ग्युसन महाविद्यालय, स. प. महाविद्यालय, खंडूजी बाबा चौक यांसह शहरात विविध ठिकाणी सुमारे २०० पोस्टर लावले आहेत. पोस्टरवर जावडेकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हातात कटोरा आणि झोळी घेतलेल्या वेषात जावडेकर यांना दाखविण्यात आले असून त्यांच्या मागे मराठी शाळेतील विद्यार्थी दाखविण्यात आले आहेत. त्याखाली ‘जावडेकर गुरुजींना, भविष्यात शाळा-विद्यार्थी भीक मागायला लावणार,’ असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे ही पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरली आहे.
‘बाप्पा, बुद्धी दे, शिक्षण हक्काची जाण दे’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 3:26 AM