पुणे: यंदाचा गणेशोत्सव ऐतिहासिक ठरणार आहे; कारण यंदा सर्वच मंडळांनी कमी वेळेत विसर्जन मिरवणूक संपविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सकाळी १० वाजता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मानाच्या गणपतींना निरोप देण्यात येणार आहे. यात जिवंत देखाव्याचा रथ, फुलांची सजावट असलेले रथ, शिवराज्याभिषेक सोहळ्याचा रथ आणि महाकाल रथ अशा दिमाखदार रथांमध्ये मानाचे गणराय विराजमान हाेणार आहेत.
दरवर्षी विसर्जन मिरवणुकीला उशीर होताे. यंदा तो कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसा ठरावही सर्व मंडळांनी केला आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपतीदेखील यात सहभागी झाला आहे. तेही मानाच्या गणपतीनंतर लगेच सायंकाळी चार-पाच वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक लवकर संपेल, अशी अपेक्षा सर्व पुणेकरांना आहे.
मानाचा पहिला : यंदाची विसर्जन मिरवणूक कमी वेळेत
मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षीच दिलेल्या वेळेत मिरवणूक संपवते. यंदाच्या वर्षी पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीची वेळ कमी होईल, यासाठी कसबा गणपती मंडळ आपली विसर्जन मिरवणूक लवकर संपवणार आहे, परंतु जरी मिरवणूक कमी वेळेची असली तरी तिचा दिमाखात वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपण्यात येणार आहे. सकाळी १०:३० वाजता लोकमान्य टिळक पुतळा येथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता टिळक चौकात मिरवणूक संपेल. या मिरवणुकीत रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथक, कलावंत ढोलताशा पथक आपली सेवा सादर करतील. तसेच नगारखाना, प्रभात बँड, कामयानी प्रशाला आणि बँक ऑफ इंडियाच्या दिंड्या असतील, अशी माहिती मंडळाचे श्रीकांत शेटे यांनी दिली.
मानाचा दुसरा : शिवराज्याभिषेक सोहळ्याचा रथ
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या गणरायाची मूर्ती सकाळी ९ वाजता पालखीत विराजमान होईल. त्यानंतर १०.३० वाजता टिळक पुतळ्यासमोर जाईल. तिथून मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल. मिरवणुकीत सतीश आढाव यांचे नगारावादन, पारंपरिक पोशाखात अश्वारूढ कार्यकर्ते असतील. न्यू गंधर्व ब्रास बँड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोलताशा पथक, ताल ढोलताशा पथक, पारंपरिक वेशात महिला व पुरूष कार्यकर्ते सहभागी होतील. विष्णुनादचे कार्यकर्ते पालखी पुढे शंखनाद करतील. अब्दागिरी, मानचिन्हे आणि चांदीच्या पालखीत विराजमान श्रींचे तेजस्वी रूप पाहता येईल. यंदाचे मुख्य आकर्षण हे शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने खास शिवराज्याभिषेक सोहळ्याचा रथ मिरवणुकीत असणार आहे. त्याचबरोबर पुण्यात प्रथमच न्यू गंधर्व बँड हनुमान चालिसा व मंगल अमंगल ही रामायण चौपाई बँडवर वाजविण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.
मानाचा तिसरा : रामराज्य फुलांच्या रथातून मिरवणूक
मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक सकाळी १०.३० वाजता निघेल. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, गंधर्व ब्रास बँड, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, फुलगाव यांचे सैनिक प्रात्यक्षिके व ढोल ताशा पथक असणार आहे. तसेच नादब्रह्म ढोल ताशा पथक, नादब्रह्म ट्रस्ट ढोल ताशा पथक आपली सेवा देईल. स्वप्निल व सुभाष सरपाले आणि अविनाश जिंदम यांनी बनविलेल्या जय श्री राम ‘रामराज्य’ फुलांच्या आकर्षक रथातून श्रींची वैभवशाली विसर्जन मिरवणूक सुरु होईल, अशी माहिती मंडळाचे प्रवीण परदेशी यांनी दिली.
मानाचा चौथा : तुळशीबाग साकारणार महाकाल रथ
मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत श्री तुळशीबाग मंडळ महाकाल रथाची सजावट करण्यात येणार आहे. रथ २८ फूट उंच असून फुलांनी सजवलेली १२ फूट उंचीची महाकालची पिंड आकर्षण असणार आहे. लकडी पुलावरील मेट्रो ब्रिजमुळे उंचीला मर्यादा असल्याने पहिल्यांदाच हायड्रॉलिकचा वापर करण्यात येणार आहे. पुष्पसजावटकार सरपाले बंधूंनी सदर सजावट केली आहे. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराची सवारी ज्याप्रमाणे निघते, त्याप्रमाणे मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी उज्जैनवरुन खास अघोरी महाराज यांचा सहभाग असणार आहे. तसेच बाहुबली महादेव हे आकर्षण असणार आहे. त्यात शिवमुद्राचा गाजत असलेला महाकालचा ठेका असणार आहे. अग्रभागी लोणकर बंधूंचे नगारा वादन, स्वरूप वर्धनी, गजलक्ष्मी, शिव प्रताप वाद्य पथके सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे नितीन पंडित यांनी दिली.
मानाचा पाचवा : टिळकांवर जिवंत देखावा
महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या पाचव्या केसरी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत गणराय विराजमान असतील. मिरवणुकीत गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक सहभागी होणार आहेत. शिवमुद्रा, श्रीराम, राजमुद्रा ढोल-ताशा पथक असणार आहेत. तसेच बिडवे बंधू यांचे नगारा वादन असणार आहे. इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने मिरवणुकीत लोकमान्य टिळकांच्या जीवनातील घटनेवर जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि रँड वधाच्या घटनेला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक हा देखावा सादर होईल.