- मनोहर बोडखे - दौंड : जाती-धर्माची भिंत ओलांडून अरब राष्ट्रांपैकी एक समजल्या जाणाऱ्या दुबईत गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सुमारे दोन हजार गणरायांच्या मूर्ती भारतातून आयात करण्यात आल्या असून येथील बाजारपेठेत विक्रीसाठी त्या उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच सजावटीचे साहित्यही बाजारात विक्रीसाठी आले आहे. दुबईत स्थायिक असलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. या नागरिकांकडून दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. दुबईत सध्या शेख महमद यांची राजवट आहे. सर्व कायदे मुस्लिम राजवटीतील असताना देखील सर्वधर्मीयांना त्यांचे धार्मिक सोहळे साजरे करता येतात. पहिले राजे शेख रशीद यांनी सर्व जाती धर्म एकच ही संकल्पना रुजवल्याने दुबईत २५ मस्जिद, २० चर्च आणि १ गणपतीचे मंदिर आहे. १९५८ मध्ये शेख रशीद या राजाने गणपती मंदिराला जागा दिली होती. त्यानुसार येथील भारतीयांनी मंदिर बांधून गणरायाची प्रतिष्ठापना केली. मंदिराच्यावर शीख धर्मीयांचा गुरुद्वारा असून या मंदिराची देखभाल गुरुदरबार सिंधी संस्थेच्यावतीने केली जाते. या संस्थेचे अध्यक्ष वासू शराफ आहेत. येथील मीना मार्केट, गणपती मंदिर परिसरातील दुकानांमधून गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. येथूनच गणेशभक्त मूर्ती घेऊन जातात आणि गणरायाची प्रतिष्ठापना घरोघरी करतात. गुरुद्वारातही गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. विसर्जन मिरवणुकीचा सोहळाही पाहण्यासारखा असतो. सर्व घरगुती गणपतींचे होडीतून वाजतगाजत विसर्जन केले जाते. यासाठी मंदिराजवळच तळे बांधण्यात आले आहे, असे येथील मूर्तीविक्रेते सनी धनसिंगानी यांनी सांगितले. येथील मीना मार्केटमध्ये ठिकठिकाणी गणेशमूर्तींसाठी विक्रीस ठेवल्या जातात. महाराष्ट्राप्रमाणे दुबईतही दगडूशेठ हलवाई आणि लालबागचा राजा या मूर्तींना मोठी मागणी असते. येथील अलआदिक ट्रेडिंगचे विक्रेते तनवीर पालटे यांनी सांगितले. गणपतीच्या मंदिराच्या बाजूला शिरीनाथ मंदिर असून या मंदिराला १९६० मध्ये दुबईचे राजे शेख रशीद यांनी जागा दिली. दरम्यान, येथील हिंदू बांधवांनी हे १९०२ मंदिर उभारले असल्याचे दुबईस्थित हिंदू कम्युनिटीचे ललित कराणी यांनी सांगितले.
पाण्याला सोन्याचा भाव, मात्र गणेशभक्तांना मोफत पाणी दुबईत पेट्रोलचा दर कमी तर पाण्याचा दर जास्त आहे. साधारणत: भारतीय चलनात पेट्रोल ६० रुपयांच्या जवळपास लिटर, तर पाणी २०० रुपये लिटर आहे. पाण्याला सोन्यासारखे भाव असतानाही दुबईतील गणेश मंदिरात गणेशदर्शनासाठी भाविकांच्या रांगा असतात. त्यातच उष्णतेचे बाराही महिने अशा परिस्थितीत मंदिराबाहेर दररोज गणेशभक्तांना मोफत पाणीवाटपाची व्यवस्था केली जाते.