पुणे : कोरोनामुळे शहरात करण्यात आलेल्या लॉक-डाऊनमुळे जिल्ह्यातील न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या काही ज्युनिअर वकिलांपुढे आर्थिक समस्या उभी राहिली आहे. ती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी पुणे बार असोसिएशनने मदत निधीसाठी आवाहन केले आहे.
बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले, यासाठी सर्व वरिष्ठ वकिलांनी मदतीसाठी पूढे येण्याची गरज आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी किमान 10 हजार रुपये अकाउंटवर ट्रान्सफर करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. वकिली व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडल्याने गरजवंत तरुण ज्युनिअर वकील बंधू भगिनींना किमान एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये वकीली व्यवसाय करणाऱ्या सर्व वकील बंधू भगिनींना यानिमित्ताने आवाहन करण्यात आले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये न्यायालयीन कामकाजही पुढे ढकलण्यात आले आहे. कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या ज्युनियर वकिलांना करोनाच्या लॉक डाऊनमुळे त्रास होऊ नये म्हणून ज्युनिअर वकिलांना पुणे बार असोसिएशन तर्फे अन्नधान्य आणि किराणा देण्यात येणार आहे. एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य बार असोसिएशन तर्फे ज्युनियर वकिलांना एका किटमध्ये देण्यात येणार आहे. एका कुटुंबातील चौघांना पुरेल एवढे अन्नधान्य या किटमध्ये असणार आहे.
पुणे जिल्हा न्यायालयात दहा-पंधरा हजाराहून अधिक वकील प्रॅक्टिस करतात. यामध्ये जूनियर वकिलांची संख्याही लक्षणीय आहे. सीनियर वकिलांकडे ज्युनियर म्हणून काम करताना सुरुवातीच्या काळात जूनियर वकिलांना पुरेसा पैसा मिळत नाही. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वरिष्ठ वकिलांकडून देण्यात येणारा पैसा त्यांना पुरेसा नसतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ज्युनिअर वकिलांना कोर्टात प्रॅक्टिस करताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. वकिलीच्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करून स्थिरस्थावर होण्यासाठी वकिलांना सुरुवातीची सहा-सात वर्षे लागतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोर्टात काम करत असलेल्या ज्युनियर वकिलांना याचा फटका बसला आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून पुणे बार असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
पाच वर्षापेक्षा कमी प्रॅक्टीस असलेल्या वकिलांना अन्नधान्य आणि किराणाचे किट तर्फे देण्यात येणार आहे. 21 दिवसांचा लॉक डाऊन, पुण्यात संचारबंदी यामुळे ज्युनिअर वकिलांच्या कुटुंबीयांना हलाखीच्या परिस्थितीला तोंड लागू नये म्हणून, ही मदत करण्यात येणार आहे. गरजू वकिलांनी पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांकडे मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.