बारामती (पुणे) : लहान मुलांचा खेळकरपणा कधी कधी जीवावर बेतण्याची भीती असते. त्यात पालक कामात व्यस्त असताना अजाणतेपणी केलेल्या उद्योग अडचणीचा ठरतो. बारामती शहरात बुधवारी (दि. १२) एका ३ वर्षीय बालकाने घरात खेळता खेळता छोटीशी अंगठी गिळली. मात्र, घरात काही काळ कुणाच्याच ही बाब लक्षात आली नव्हती. तर मुलगा अंगठी गिळल्यानंतर काही वेळ खेळण्यात व्यस्त होता. मुलाला त्रास होऊ लागल्यानंतर मात्र त्याला तातडीने बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र मुथा यांच्याकडे आणण्यात आले. तत्पर शस्त्रक्रिया केल्याने मुलाची प्रकृती स्थिर झाली.
अंगठी गिळलेल्या बालकाला दवाखान्यात आणल्यावर डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा यांनी तपासणी केली. तसेच तातडीने उपचार सुरु केले. प्राथमिक उपचार झाले खरे, पण त्याला बर वाटत नव्हते, उलट्या थांबत नव्हत्या. त्याने अंगठी गिळल्याची कोणालाही माहिती नव्हती. तपासणी केल्यावर त्या बालकाचा एक्स रे काढला तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्याच्या श्वसननलिकेनजीक एक छोटी अंगठी त्या एक्सरे मध्ये आढळली. त्यांनी तातडीने डॉ. सौरभ निंबाळकर, डॉ. बी. बी. निंबाळकर, भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार यांना बोलावले. त्यानंतर तातडीने अंगठी काढण्याच्या उपचाराला सुरवात करण्यात आली.
संबंधित बालकाच्या घशातून दुर्बिणीद्वारे ही अंगठी बाहेर काढण्यात आली. त्या नंतर त्या बालकाची प्रकृती वेगाने सुधारली. डॉ. मुथा यांच्या समयसूचकता व डॉ. निंबाळकर तसेच डॉ. अमर पवार यांच्या तत्परतेमुळे ही अंगठी काढली गेल्याने त्या बालकाचे प्राण वाचले. लहानपणी मुले खेळकर असतात. खेळताना तोंडात काही घालणार नाहीत, गिळणार नाहीत, याची पालकांनी काळजी घ्यायला हवी. छोट्या-छोट्या वस्तू, शेंगदाण्यासारख्या गोष्टींपासून मुलांना दूर ठेवावे, असे आवाहन डॉ. सौरभ मुथा यांनी केले आहे.