बारामती (पुणे) : २५० वर्षांपूर्वीच्या जुन्या काशाच्या भांड्याच्या विक्रीतून २०० कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत चौघांनी एकाची १ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी राजेंद्र बापूराव शेलार (रा. सणसर ,ता. इंदापूर)असे फिर्यादीचे नाव आहे. त्यानुसार रफिक इस्माईल तांबोळी (रा. लोहगाव, पुणे), सिराज शेख उर्फ पानसरे (रा. कोंढवा), उमेश उमापुरे (रा. कासारशिरसी, ता. निलंगा, जि. लातूर) व धनाजी पाटील (रा. सांगली) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१४ ते २०१६ च्या दरम्यान रफिक तांबोळी याच्याशी फिर्यादीची ओळख झाली. त्यावेळी त्याने आळंदी येथील लिटिगेशनचा प्लाॅट असून तो क्लिअर करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. प्लाॅटची विक्री झाल्यावर त्यातून ५० कोटी रुपये मिळणार असून त्यातील ४ कोटी रुपये देतो, असे अमिष त्याने दाखवले. त्यामुळे फिर्यादीने त्याला १ लाख रुपये रोख दिले. १५ दिवसानंतर तांबोळी याने पुन्हा पैशाची मागणी केली. त्यावेळी त्याला २ लाख रुपयांची मदत करण्यात आली. चार कोटीच्या अमिष दाखवत त्याने पुन्हा पैशाची मागणी केल्यावर शेलार यांनी त्याच्या खात्यावर ४ लाख ६५ हजार रुपये भरले. त्यानंतरही रफिक व त्याची पत्नी आतिया या दोघांच्या खात्यावर १२ ते १७ लाख रुपये भरण्यात आले.
२०१७ मध्ये फिर्यादीने पैसे परत मागितले असता त्याने माझ्याकडे काशाचे भांडे असून ते २५० वर्षांपूर्वीचे आहे. त्यात वीज पडून इलेक्ट्रीक पाॅवर तयार झालेली आहे. हे भांडे नासा, ईस्त्रोसारख्या संस्था विकत घेतात. ही रक्कम २०० ते ३०० कोटी असेल. परंतु त्यात किती पाॅवर निर्माण झाली आहे याची पडताळणी करण्यासाठी मला फी भरावी लागेल. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही मदत करा, असे सांगितले. त्याला भुलून फिर्य़ादीने सणसर येथील गट क्र. ६३ मधील ९० गुंठे जमिन विकत त्याला ९० लाख रुपये दिले. तदनंतर तो मोबाईल बंद करून पसार झाला.
रफिक याचा शोध घेत असतानाच फिर्यादीची शेख व उमापुरे यांच्याशी भेट झाली. फिर्यादी आर्थिक अडचणीत आले होते. त्याचा फायदा घेत या दोघांनीही काशाच्या भांड्याची कल्पना पुन्हा त्यांच्या डोक्यात उतरवली. त्यामुळे फिर्यादीने पुन्हा जमिन गहाण ठेवत वेळोवेळी १७ लाख रुपये रोख व उमापुरे याच्या खात्यावर १ लाख ११ हजार रुपयांची रक्कम भरली. धनाजी पाटील याने सुद्धा याच पद्धतीने फिर्य़ादीला अमिष दाखवत ३ लाख ८० हजार रुपये खात्यावर भरण्यास भाग पाडले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.