बारामती : बारामती शहरात नगरपरीषदेच्या प्रशासनाने वारंवार सुचना करुन देखील नियमांचे उल्लंघन करणे खासगी अॅकॅडमी चालकांना महागात पडले आहे. वारंवार लेखी सूचना करूनही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या अॅकेडमींवर बारामतीत नगरपरिषद प्रशासनाने टाळे ठाेकले आहे. बुधवारी (दि २५) दिवसभर हि कारवाई सुरु होती. शहरातील १८ अकॅडमीला टाळे ठोकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.या कारवाईमुळे सबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील मोहसीन पठाण हे बेकायदेशीर अॅकेडमींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी नुकतेच प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक घेत कारवाईचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, अग्निशमन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीनंतर शहरात ज्या अॅकेडमी नियमबाह्य आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी अग्निशमन दलाचे पर्यवेक्षक पद्मनाथ कुल्लरवार यांना दिले होते. त्यानुसार कुल्लरवार यांनी पथकासह आजपासुन अचानक कारवाइर्ला सुुरुवात केली. या अॅकेडमींना पालिकेकडून ७ जून रोजी पहिली नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ४ आॅक्टोबर रोजी दुसरी नोटीस बजावण्यात आली. या नोटीसीद्वारे कोणत्याही नियमांचा भंग होवू नये, अशी ताकीद देण्यात आली होती. परंतु या दोन्ही नोटींसींकडे अॅकेडमींनी दुर्लक्ष केले. अनेक अॅकेडमींनी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणार्या अॅकॅडमीवर कारवाइ सुरुच राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.