बारामती : शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअप्ससाठी देशात एकमेव बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड नीती आयोगाने केली आहे. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमार्फत सन २०१७-१८ साठी भारतातील ७२ सेंटरची घोषणा शुक्रवारी (दि. ४) निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यकारी संचालक रमणन रामानाथन यांनी केली. त्यामध्ये ही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता शेतकरी ते कृषिउद्योजक वाटचाल सहजपणे होणार आहे. शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल.आयोगाच्या घोषणेमुळे हे महाविद्यालय आता शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे उद्योगामध्ये रुपांतरित करणारे जागतिक दर्जाचे केंद्र बनणार आहे. ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी व स्वच्छतेत आयोगास देशभरात १०० जागतिक दर्जाची केंद्रे उभारायची आहेत. त्यामधील ७२ केंद्रांची निवड निती आयोगाच्या निवड समितीने केली. या केंद्रांमध्ये आता अटल इनक्युबेशन सेंटर्स उभारली जाणार आहेत. यामध्ये शेतीच्या क्षेत्रात आसाम विद्यापीठ व बारामतीचे कृषी महाविद्यालय या दोन संस्थांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, देशात शेतीच्या बाबतीत महाविद्यालय म्हणून एकट्या बारामतीचा समावेश आहे. नीती आयोगाच्या सेंटरसाठी देशातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते. हे सेंटर जागतिक दर्जाच्या संशोधन केंद्राशी संलग्न राहील. नीती आयोगाच्या निवड समितीसमोर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी या नियोजित केंद्रासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सादरीकरण केले. आता या नव्या सेंटरमध्ये महाविद्यालयातील प्रा. जया तिवारी, प्रा. सोनाली सस्ते, प्रा. श्रीकांत कर्णेवार, प्रा. अमित काळे, प्रा. दादा पाटील व प्रा. चंद्रशेखर शेंडे हे प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.————-——————————————आमची जबाबदारी आता अधिक वाढली : पवारनीती आयोगाने देशातील एकमेव कृषी महाविद्यालयाची दखल घेतली. यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. महाविद्यालयात उभारले जाणारे सेंटर शेती व शेतीपूरक व्यवसायात, नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यात, शेतीपूरक व्यवसायाची गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे. यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू, असे बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सांगितले.——————
शेतीच्या जागतिक दर्जा स्टार्टअप्ससाठी बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 8:46 PM
शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल.
ठळक मुद्देनीती आयोगाची घोषणा, जगातील शास्त्रज्ञांचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारनीती आयोगाच्या सेंटरसाठी देशातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर