लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : तालुक्यात गेल्या चोवीस तासांत एकूण ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वडगाव निंबाळकर मंडलात सर्वाधिक १९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. आकड्यांमध्ये जरी हा पाऊस दिसत असला, तरी प्रत्यक्षात बारामती तालुका व जिरायती भागात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यात मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने जोर लावला आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागात तुरळक ठिकाणी हलका ते रिमझीम स्वरूपात पाऊस झाला आहे. पेरणी योग्य पाऊस झाला असला, तरी ओढ्या-नाल्यांमधून पाणी न वाहिल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या लांबवल्या आहेत. रिमझीम पावसामुळे मशागतीच्या कामांना मात्र वेग आला आहे. इंदापूर तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. वालचंदनगर, कळंब, निरवांगी, लासुर्णे, कुरवली, वडापुरी, भिगवण आदी परिसरात मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रथमच एवढ्या मोठ्याप्रमाणात इंदापूर तालुक्यात पाऊस झाला आहे. बारामती तालुक्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील पाच वर्षांपासून जिरायती भाग दुष्काळाशी झगडत आहे. तसेच, पाण्याअभावी दर वर्षी येथे चाराटंचाई असते.
बारामतीला प्रतीक्षा दमदार पावसाची
By admin | Published: June 15, 2017 4:47 AM