बारामती (पुणे) : बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, तज्ञ संचालक प्रीतम पहाडे यांचा राजीनामा शनिवारी (दि. ८) बँक संचालक मंडळाच्या बैठकीत फेटाळण्यात आला आहे. तर उपाध्यक्ष रोहित घनवट तसेच तज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर या दोघांचा राजीनामा मात्र मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे अध्यक्षपदी सातव कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी गुरुवारी (दि. ६) राजीनामे दिले होते. बँकेचे चेअरमन सातव यांच्या नेतृत्वाखाली मागील आर्थिक वर्षात बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली. बँकेचा एनपीए लक्षणीयरीत्या खाली आणला. बँकेला आजपर्यंतचा विक्रमी ढोबळ नफा झाला. तसेच ७ कोटी ९० लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेच्या यशाचे कौतुक होत असतानाच चेअरमन सातव यांच्यासह चौघांनी राजीनामे दिल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली होती.
२७ डिसेंबर २०२१ रोजी विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांनंतर अवघ्या १५ महिन्यांनी सातव यांनी राजीनामा दिला होता. पवार यांनी नवीन पदाधिकारी निवडीसाठी हे राजीनामे घेतल्याची चर्चा होती, आजच्या निवडीनंतर ही चर्चा खरी ठरली आहे. चेअरमन सातव यांनी बँकेची गेल्या १५ महिन्यात केलेले कामगिरी पाहता त्यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. चेअरमनपदी सातव यांना कायम ठेऊन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातव यांनी केलेल्या कामाचे बक्षीस दिल्याचे मानले जात आहे. तज्ञ संचालक हे बारामती येथील प्रख्यात ‘सीए’ आहेत. त्यांनी देखील बँकेच्या आर्थिक कामगिरीमध्ये महत्वाची भुमिका बजावली आहे. त्याची देखील दखल घेत अजित पवार यांनी त्यांना तज्ञ संचालकपदी कायम ठेवले आहे.
दरम्यान, व्हाईस चेअरमन रोहत घनवट यांचा राजीनामा मंजुर झाल्याने पवार या पदावर कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच तज्ञ संचालक बहुळकर यांच्या जागी कोणाला संधी मिळते, हे येत्या काही दिवसांतच समजणार आहे.